ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक मुकेशच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान आज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगिती दिली होती. दोषी मुकेशने 1 फेब्रुवारीचा डेथ वॉरंट टाळण्यासाठी आणि राष्ट्रपतींची दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात अपील दाखल केले होते.
दिल्लीच्या कोर्टाने चारही दोषींच्या फाशीसाठी 1 फेब्रुवारीची मुदत दिली आहे. न्यायालयाने दोषींच्या अपिलावर सर्वोच्च सुनावणी घेण्यास काल सहमती दर्शवली आणि आज त्यावर सुनावणी सुरु करण्यात आली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी तिहार तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मुकेशचं लैंगिक शोषण झाल्यानंतर त्याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आलं.
त्या म्हणाल्या, दया याचिका फेटाळण्यापूर्वीच दोषी मुकेश सिंह याला वेगळ्या तुरुंगात टाकण्यात आले होते. हे तुरुंगाच्या नियमांविरुद्ध आहे. सुप्रीम कोर्टाने ठरविल्यानुसार राष्ट्रपतींच्या निर्णयाला मेरिटवर आव्हान देता येऊ शकत नाही. मात्र तुरुंग प्रशासनाकडून नियमभंग केला जात आहे.