सावंतवाडीत एटीएममधील घटना : महिलेच्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक
सावंतवाडी:
सावंतवाडी येथील प्रसाद बर्गे हे राजश्री फोटो स्टुडिओजवळील युनियन बँकेच्या एटीएममध्ये आपल्या नातेवाईकाच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा करण्यासाठी मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान गेले. त्यांनी दोन लाखाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी एटीएममध्ये जमा केली. मात्र, जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पैसे खात्यात जमा न होता एटीएममध्ये अडकून राहिले. सदर रक्कम जमा झाली, असे समजून बर्वे निघून गेले. त्याचवेळी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या सावंतवाडी-सबनीसवाडा येथील संजना संजय जाधव यांना सदर पैसे आढळले. त्यांनी ही 1 लाख 98 हजार रुपयांची रक्कम पोलिसांकरवी प्रसाद बर्गे यांच्याकडे सुपुर्द केली. संजना जाधव यांनी दाखविलेल्या या प्रामाणिपणाचे कौतुक होत आहे.
सहाय्यक निरीक्षक अण्णासो बाबर यांनी जाधव यांचा त्याच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. अलिकडेच संतोष तळवणेकर यांनी त्यांच्या खात्यात चुकून जमा झालेले 50 हजार रूपये खातेदाराला परत केले होते. ही घटना ताजी असताना शहरात आणखी एक अशीच घटना घडली आहे.
सावंतवाडीतील प्रसाद बर्गे यांनी मंगळवारी सकाळी आपल्या नातेवाईकांना महत्वाच्या कामासाठी अर्जंट पैसे पाठविण्यासाठी शहरातील बसस्थानकनजीकच्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये दोन लाखाची रक्कम (डिपॉझिट) भरणा केली. त्यावेळी भरलेल्या रकमेतील एक दोन हजार रुपयांची नोट खराब आल्याने मागे आली. आपली उर्वरित रक्कम नातेवाईकांच्या खात्यात जमा झाली असल्याचे समजून बर्गे एटीएममधून निघून गेले. त्यावेळी सावंतवाडी शहरातील युनियन बँक एटीएममध्ये दोन हजार रु. काढण्यासाठी संजना सावंत गेल्या असता त्यांना सुमारे दोन लाखाची रोकड एटीएमएममध्ये आढळली. जाधव यांनी सदरची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. सदरची रक्कम कोणाची आहे, याची पोलीस व बँक अधिकाऱयांनी खात्री केल्यानंतर त्यांना ती रक्कम परत करण्यात आली. सौ. सावंत यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस अधिकारी, बँक कर्मचारी व संबंधित रक्कमधारकाने भरभरून कौतुक केले.









