चलनातील वापर कमी: दोन वर्षात छपाई नसल्याचे केंद्राकडून स्पष्ट
सूरज मुल्ला/आटपाडी
बहुचर्चित नोटबंदीनंतर चलनात आलेली दोन हजार रूपयांची नोट सध्या दुर्मिळ बनत असल्याचे चित्र मार्केटमध्ये आहे. 2000ची नोट चलनात अत्यंत कमी प्रमाणात वापरात येत असुन दोन वर्षात या नोटांची नव्याने छपाई नसल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने ही नोट अचानक बंद होणार नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016मध्ये नोटबंदीची घोषणा केली चलनातील 1000 आणि 500रूपयांच्या नोटा व्यवहारातुन बाजुला करण्यात आल्या. त्यानंतर दोन हजारांच्या आणि 500च्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. नोटबंदीनंतर जुन्या नोटा बदलुन घेण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांचे हाल आणि श्रीमंतांची सोय याचे चित्र देशाने पाहिले. तर नोटा बदलुन देण्याच्या नावाखाली झालेले धंदे देखील लोकांसमोर आले. या नोटबंदीमुळे काळा पैसा कितपत अजेडात आला यापेक्षा सर्वसामान्यांना मात्र अतोनात हाल झाले.
मागील वर्षभरापासुन मात्र चलनात असलेली दोन हजारांची नोट दिसणे दुर्मिळ झाले आहे. एटीएम मशीनसह बँकांमधुनही 2000ची नोट जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र आहे. लाखो-कोटÎावधींचे व्यवहार असलेले व्यापाऱयांसह अनेक मोठÎा उलाढालींच्या ठिकाणीही अशा नोटा येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या नोटा येताहेत. त्या अत्यंत जुन्या असल्याचे भासत आहे. दोन हजाराऐवजी 500रूपयांचीच नोट जास्तीत जास्त प्रमाणात चलनात असुन दोन हजाराची नोट दुर्मिळ होत असल्याने पुन्हा एकदा अचानक ही नोटदेखील मार्केटमधुन गायब होते की काय? अशा चर्चांना वेग आला आहे.
त्यातच तीन दिवसापुर्वी लोकसभेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी 2019-20 आणि 2020-21 या दोन वर्षात 2000ची नोट छापली गेली नसल्याचे स्पष्ट केल्याने केंद्र सरकारनेच या नोटा चलनातुन कमी करण्याची भुमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दोन हजाराच्या नोटांचा वापर कमी करण्याचे केंद्राचे धोरण असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट असलेतरी दोन हजारांच्या नोटा चलनातुन नेमक्या कोणत्या कारणाने कमी केल्या जात आहेत, याचा मात्र अद्यापतरी उलगडा झालेला नाही.
सरकारने सातत्याने डिजिटल व्यवहारांसाठी लोकांना प्रेरीत करत जनजागृती केली आहे. त्या अनुषंगाने अनेक ऍप वापरले जात असुन डिजिटल व्यवहार देखील वाढत असल्याचे चित्र आहे. चलनातुन नोटा पुर्णत: बंद होणे आज जरी शक्य नसलेतरी सध्याच्या धोरणानुसार 2000ची नोट मात्र क्वचितच दर्शन देत असल्याची वस्तुस्थिती आहे. आत्ता केंद्र सरकारनेच लोकसभेत दोन वर्षे या नोटा छपाई झाल्या नसल्याचे सांगितल्याने हळहळु दोन हजाराची नोट व्यवहारांमधुन रामराम घेईल, असेच चित्र आहे.