केंद्र सरकारकडून घोषणा, सिरम-भारत बायोटेक वादावर पडदा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विरोधात निर्णायक युद्ध करण्यास केंद्र सरकार सज्ज झाले आहे. येत्या दोन आठवडय़ांमध्ये देशव्यापी लसीकरणाचा प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. भारतनिर्मित कोव्हॅक्सिन लस देण्यापूर्वी इच्छुकाची अनुमती घेणे आवश्यक आहे. ती घेतल्यानंतर 10 दिवसांच्या आत लस दिली जाऊ शकते, असेही स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.
देशव्यापी लसीकरणाची सर्व सज्जता पूर्ण झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य विभागाकडून करण्यात आले. पाच राज्यांमध्ये लसीकरण सराव यशस्वी ठरला आहे. तसेच गेल्या शनिवारी देशव्यापी सराव करण्यात आला. त्याचा अहवालही समाधानकारक आहे. त्यामुळे लसीकरणासाठी देश सज्ज झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. लससाठा करण्यासाठी देशभरात 41 हजार शीतकक्षांची स्थापना करण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
भ्रमणध्वनीवर समजणार
लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांना लसीकरणाचा दिनांक आणि वेळ भ्रमणध्वनीवरून (मोबाईल) कळविण्यात येणार आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार असून एक डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. लस घेतल्यानंतरही दक्षता बाळगावीच लागणार असून आरोग्य नियम व शारिरीक अंतर यांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नोंदणीची आवश्यकता कोणाला
आरोग्य सेवक व इतर आघाडीवरील कर्मचारी तसेच स्वयंसेवकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे त्वरित लसीकरण होणार आहे. मात्र इतर सर्वसामान्य लोकांना लस घ्यायची असेल तर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे.
प्रथम टप्प्यात 30 कोटी
लसीकरणाच्या प्रथम टप्प्यात येत्या सहा महिन्यांमध्ये 30 कोटी भारतीयांचे लसीकरण होणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सज्जता ठेवण्यात येत आहे. लसीची वाहतूक, साठवणूक आणि व्यवस्थापन सुरळीत व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रथम मर्यादित संख्येत लसीकरण होणार असून परिणाम बघून नंतर संख्या व वेग वाढविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने योजिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द
या वर्षीच्या गणतंत्र दिन संचलनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही आमंत्रणाचा स्वीकार केला होता. तथापि, ब्रिटनमध्ये कोरोनाची स्थिती अधिकच बिघडल्याने, तसेच तेथे कोरोनाचा नवा अवतार वेगाने प्रसारित होत असल्याने जॉन्सन यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा दोन्ही देशांकडून करण्यात आली. यामुळे यंदाच्या गणतंत्रदिन कार्यक्रमाला ते प्रमुख अतिथी असणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले. हा कार्यक्रमही यंदा आटोपशीर पद्धतीने केला जाणार आहे.
बॉक्स
भारत बायोटेक, सिरम वाद संपुष्टात
केंद्र सरकारने सिरमची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिल्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. कोव्हॅक्सिनला केवळ पर्यायी लस म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र मुख्य लसीकरण कोव्हीशिल्डचेच होणार असे प्रतिपादन सिरमने केले होते. तर भारत बायोटेकने ते फेटाळले होते. कोव्हॅक्सिन लसीलाही मुख्य लस म्हणून मान्यता मिळाली असून ती केवळ पर्यायी लस नाही, असे भारत बायोटेकचे म्हणणे होते. त्यांच्यातील वादामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता हा वाद दोन्ही कंपन्यांनी सामोपचाराने संपुष्टात आणला आहे. तसेच लसीचे उत्पादन सुरळीत करण्याची हमी दिली आहे. केवळ भारतासाठीच नव्हे, तर इतर देशांसाठीही ही लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही लसी इतर देशांना निर्यातही केल्या जाऊ शकतात असे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वाद मिटल्याचे घोषित केले.









