गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज : जिल्हय़ाची प्रवेशद्वारे, रेल्वे, बसस्थानक, चेक पोस्टवर आरोग्य पथके : चाकरमान्यांना कोरोना टेस्ट करावी लागणार
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवाला अवघे वीस दिवस राहिले असून सिंधुदुर्ग जिल्हय़ात दोन लाखाहून जास्त चाकरमानी गणेशोत्सवाला येतील, असे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने जोरदार पूर्व तयारी सुरू केली आहे. सर्व चाकरमान्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हय़ाचे प्रवेशद्वार, प्रत्येक रेल्वे व बसस्थानक, चेक पोस्टवर आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. त्याचे नियोजन सुरू झाले असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी खारेपाटण चेकपोस्ट, रेल्वे स्थानक व आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली व सूचना केल्या.
गतवषी गणेशोत्सव काळातच कोरोनाचा प्रभाव वाढला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आतापासूनच अलर्ट केली आहे. गेले दीड वर्ष कोरोनाच्या भीतीने चाकरमानी मंडळीही फारशी आली नव्हती. मात्र यावेळी गणेशोत्सवाला मोठय़ा संख्येने चाकरमानी येण्याची शक्मयता आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातही कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे यावषी गणेशोत्सवाला येणाऱया लोकांची संख्या जास्त प्रमाणात असणार आहे. सर्व रेल्वे गाडय़ांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. एसटी व खासगी बससुद्धा मोठय़ा प्रमाणावर बुक झाल्या आहेत. त्यामुळे दोन लाखाहून जास्त चाकरमानी गणेशोत्सवाला सिंधुदुर्गात येतील, असे जिल्हा प्रशासनाने अपेक्षित धरले आहे.
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमाऱयांना काही निर्बंध घातले आहेत का, याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली असता, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून पुढील आठवडय़ात याबाबत निर्बंध काय असतील, याची माहिती जाहीर केली जाणार आहे. मात्र मुंबई व सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला किंवा कोरोना लसीचे दोन डोस अनेक लोकांनी घेतले असले, तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक चाकरमान्याला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. जिल्हय़ातील नागरिक व चाकरमाऱयांनी आतापर्यंत जसा संयम पाळला तसाच संयम पाळला व विरोध न करता कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी सहकार्य केल्यास निश्चितच तिसऱया लाटेचा संभाव्य धोका टाळता येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. कोरोना टेस्ट करणे हे स्वतःसाठी आणि दुसऱयासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांनी सुद्धा वाद न घालता कोरोना टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या काळात जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन नियोजनासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासोबत खारेपाटण तपासणी नाका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकवली रेल्वे स्टेशनला भेट दिल्याचे सांगितले.
खारेपाटण तपासणी नाक्मयावर वाहनांच्या थांब्याबाबत नियोजन करावे, वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, परिवहन मंडळाने एस. टी. तील प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र बुथ उभारावा, तपासणीसाठी आरोग्य विभागाने पथकांची संख्या वाढवावी, तपासणी नाक्मयावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पोलिसांनी पथकांची संख्या वाढवावी, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
जिल्हय़ातील प्रत्येक रेल्वे स्थानक व बसस्थानक, सर्व तपासणी नाकी, जिल्हय़ाची प्रवेशद्वारे तसेच खासगी बस थांबा या ठिकाणी आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. आरोग्य, महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकामार्फत जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे आणि पॉझिटिव्ह टेस्ट आली तर कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱयांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. तर सौम्य लक्षणे असणाऱयांना ‘होम आयसोलेट’ केले जाणार आहे.
दोन लाखाहून जास्त चाकरमानी गणेशोत्सवाला येणार असल्याने तपासणीच्या वेळी गर्दी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आरोग्य पथके अधिक प्रमाणात वाढविली जाणार आहेत. वाहन पार्किंगसाठी सुद्धा मोठय़ा जागेची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना टेस्ट करावी लागणार असल्याने चाकरमान्यांनी मुंबईहून येतानाच कोरोना टेस्ट करून आल्यास गर्दी टाळता येणे शक्मय होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.









