एकाच घराचा एक भाग एका राज्यात तर दुसरा दुसऱया राज्यात, अशा परिस्थितीत एक कुटुंब आजही रहात आहे. ही अनोखी घटना हरियाणातील डबवाली गावातील आहे. हे घर हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांच्या मधोमध आहे. या दोन राज्यांमधील सीमारेषा निश्चित करण्यासाठी या घराच्या मधोमध एक भिंत बांधली गेली. त्यामुळे सासू हरियाणात आणि मुलगा व सून पंबाजमध्ये असा प्रकार घडला. आता सासूला सुनेशी बोलायचे असेल तर भिंतीला असलेल्या झरोक्याचा उपयोग करावा लागतो. हा अद्भूत प्रकार देशात एकमेव आहे.
हे घर जगवंती देवी यांचे आहे. त्या आपल्या कुटुंबासह या घरात राहतात. त्यांच्या घराचा एक दरवाजा हरिणात उघडतो तर दुसरा पंजाबमध्ये. भिंत बांधून या घराचे दोन भाग करण्याचे कारण वीजेचे नवे कनेक्शन हे आहे. हे वीज कनेक्शन हरियाणा सरकारकडून त्यांनी घेतले आहे. त्यामुळे या वीजेचा उपयोग या घराचा हरियाणात जो भाग आहे, त्या भागासाठीच करावा लागणार होता. म्हणून मध्ये भिंत घालून दोन भाग हरियाणा सरकारच्या सांगण्यावरून करावे लागले.
गेल्या आठवडय़ापर्यंत अशी स्थिती नव्हती. पण काही काळापूर्वी या घरात आणखी खोल्या बांधण्यात आल्या. त्या हरियाणा राज्याच्या सीमेत बांधल्या गेल्या. त्या खोल्यांसाठी नवे वीजेचे कनेक्शन घ्यावे लागले. तसेच ते घेताना मध्ये भिंत बांधावी लागली, अशी माहिती जगवंनी देवी यांनी दिली. आता या घरात पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांकडून मिळालेली वीज कनेक्शन्स आहेत. पण घराचे दोन भाग करावे लागले आहेत. डबवाली गावात दोन्ही राज्यांमध्ये असलेली अनेक घरे आहेत. तथापि, वीज कनेक्शनसाठी घराचे दोन भाग करावे लागण्याची वेळ प्राप्त माहितीनुसार तरी देशात एकमेव आहे, असे मानले जाते.









