हर्ष आणि आदर्श आवटे खून प्रकरण, आई अनुष्काची प्रकृती चिंताजनकच
प्रतिनिधी /सातारा
पतीच्या विरहातून पोटच्या दोन मुलांचा टॉवेलने गळा दाबून खून करत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणारया आईवर बुधवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलांच्या खुनानंतर आत्महत्येचा प्रयत्न करणारी आई अनुष्का हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक भरत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
हर्ष सुजीत आवटे (वय 8), आदर्श सुजीत आवटे (वय 6) अशी खून झालेल्या चिमुकल्या भावंडांची नावे आहेत. त्यांची आई अनुष्का सुजीत आवटे हिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनुष्का आवटे यांचे पती सुजीत आवटे यांचे सहा महिन्यापुर्वी अपघाती निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अनुष्का आवटे या नैराश्यात होत्या. पती विरहामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नाही असे त्यांना सातत्याने वाटत होते. यातूनच त्यांनी पोलीस अधिकारी यांच्या नावे चिठ्ठी लिहून बुधवारी सकाळी हर्ष व आदर्श या दोन पोटच्या मुलांचा टॉवेलने गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार इतर नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलांसह त्यांच्या आईला तात्काळ रूग्णालयात नेले. मात्र दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. आई अनुष्का ही गंभीर जखमी होती. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुष्का यांनी चिठ्ठीत लिहताना आपण पती विरहातून हे कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे लिहले आहे. दरम्यान पोटच्या दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी अनुष्का यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणीही अनुष्का यांच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात स्वतः पोलीस फिर्यादी झाले आहेत. अनुष्का यांची प्रकृती चिंताजनक असून या घटनेने रूक्मिणीनगर परिसर अजुनही सुन्न आहे.









