ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे काल निधन झाले आहे. यानंतर आज ऋषिकेश येथील गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फूल चट्टी घाट येथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला.
दरम्यान, लॉक डाऊन मुळे योगी आदित्यनाथ यांनी अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेत कोरोना संकटावर मात करण्यासाठी काम करत राहण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे आज देखील योगी आदित्यनाथ यांनी एक बैठक घेतली. बैठकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, योगी यांनी आपल्या आईला भावनिक पत्र देखील लिहिले. या मध्ये त्यांनी म्हटले की, माझ्या वडिलांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले. ते माझे जन्मदाता आहेत. या अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा आहे.
मात्र, जागतिक महामारी कोरोना विरुद्ध सारा देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या 23 कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही आहे. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि लॉक डाऊन संपल्यावर दर्शनासाठी येईन.









