काँग्रेसचा कुर्टी वीज खात्यावर मोर्चा : जनतेवर वाढीव बिलांचा भूर्दंड
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनचे कारण पुढे करून वीज खात्याने जी भरमसाठ रकमेची बिले ग्राहकांना पाठविली आहेत त्याचा निषेध करीत, दोन महिन्यांचे वीज बिल जनतेला माफ करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांच्या नेतृत्वाखाली फोंडा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल मंगळवारी सकाळी कुर्टी येथील वीज खात्यावर मोर्चा नेला.
वीज खात्याचे कार्यकारी अभियंते दीपक नाईक यांच्याकडे वाढीव रकमेच्या बिलासंबंधी स्पष्टीकरण मागण्यात आले. तसेच दोन महिन्यांची वीज बिले जनतेला माफ करण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठविण्याची मागणीही काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. वीज खाते वाढीव रकमेच्या वीज बिलामागील लॉकडाऊन हे कारण सांगत आहे. मात्र त्याला जनता नव्हे तर सरकारच जबाबदार आहे, असे संकल्प आमोणकर यांनी प्रसार माध्यमासमोर बोलताना सांगितले.
लॉकडाऊनच्या नावे जनतेवर भुर्दंड कशाला
सरकारने लॉकडाऊनची सक्ती केल्यानेच लोकांना घरी बसावे लागले. पूर्ण दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये जनतेने सरकारला सहकार्य केले. वीज बिल आकारताना प्रति युनिटमागे शंभर युनिटपर्यंत 1 रुपये 40 पैसे आकारले जातात. मात्र लॉकडाऊनच्या काळातील युनिट मोजताना पूर्ण दोन महिन्याच्या प्रति 4 ते 5 रुपये दर लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन महिन्यात सरासरी रु. 300 ते रु. 500 या प्रमाणे येणारी वीज बिले 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत एवढी भरमसाठ आली आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. कुटुंबाची गुजारणा करताना प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिले पाठवून जनतेवर अतिरिक्त भुर्दंड लादलेला आहे, असा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला. केरळ व दिल्ली सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले जनतेला माफ केली आहेत, गोवा सरकारनेही तसा निर्णय घेण्याची मागणी आमोणकर यांनी केली.
दुरुस्ती तर नाहीच, उलट उर्मट उत्तरे..
घरगुती वीज बिलाबरोबरच व्यावसायिक वीज बिलेही भरमसाठ वाढविण्यात आलेली आहेत. बिलांची दुरुस्ती करण्यासाठी वीज खात्यात जाणाऱया नागरिकांना तेथील कर्मचाऱयांकडून उर्मट उत्तरे ऐकून घ्यावी लागत आहेत. जनतेच्या समस्यांबाबत सरकार अत्यंत असंवेदनशिल बनल्याचा आरोप ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी केला. रेल्वे व इतर सरकारी खात्यांप्रमाणेच वीज खात्याचेही खासगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यासाठी रिलायन्स व इतर कंपन्यांची नावे पुढे येऊ लागली आहेत, असे फोंडा गट काँग्रेसचे अध्यक्ष अरुण गुडेकर म्हणाले.
यावेळी फोंडा, मडकई, प्रियोळ व शिरोडा गट काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वीज खात्याच्या प्रवेश द्वारात वीज बील प्रातिनिधीक स्वरुपात जाळून वाढीव बिलासंबंधी निषेध करण्यात आला.









