वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) कोरिया ओपन व मकाव ओपन या दोन स्पर्धा रद्द केल्याचे बुधवारी जाहीर केले. या विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दोन स्पर्धांशिवाय चीनमध्ये होणारी विश्व कनिष्ठ बॅडमिंटन चॅम्पियनशिपही लांबणीवर टाकल्याचे त्यांनी सांगितले. कोरिया ओपन ही सुपर 500 स्पर्धा 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत नियोजित होती. या स्पर्धेने बॅडमिंटन वर्ल्ड टूरची सुरुवात होणार होती. गेल्या मार्चमध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर बॅडमिंटन हंगाम थांबवण्यात आला होता. मकाव ओपन ही सुपर 300 स्पर्धा 2 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार होती. ‘कोरिया मास्टर्स 2021 ही स्पर्धा आधी लांबणीवर टाकल्याचे सांगण्यात आले होते. पण आता ती रद्दच करण्यात आली आहे. कोव्हिड 19 ने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घालण्यात आलेले निर्बंध आणि गुंतागुंत यामुळे आयोजकांसमोर स्पर्धा रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला,’ असे बीडब्ल्यूएफने निवेदनाद्वारे सांगितले. ‘या हंगामातील उर्वरित स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बीडब्ल्यूएफ बांधील असून खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेत त्याचे नियोजन करण्यात येईल. खेळाडूंसाठी मानांकन गुण महत्त्वाचे असून मिळणारे बक्षीसही त्यांच्यासाठी मोलाचे असणार आहे, या बाबींचाही विचार करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
फेडरेशनने नोव्हेंबरमध्ये सारब्रुकेन, जर्मनी येथे होणाऱया सारलॉरलक्स ओपन स्पर्धेच्या श्रेणीत सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या स्पर्धेला आता वर्ल्ड टूर सुपर 500 चा दर्जा देण्यात आला असून त्याचे नावही हायलो ओपन 2021 असे बदलण्यात आले आहे. ‘वर्ल्ड टूरचा युरोपियन टप्पा या स्पर्धेने पूर्ण होणार आहे. यात डेन्मार्क व फ्रान्स स्पर्धांचाही समावेश आहे,’ असेही बीडब्ल्यूएफने म्हटले आहे. मलेशियन मास्टर्स सुपर 500 व मलेशिया ओपन सुपर 750 या स्पर्धा आधी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे चायना ओपन (सप्टेंबर 21-26), जपान ओपन (सप्टेंबर 28-ऑक्टो. 3), फुझोयू चायना ओपन (9-14 नोव्हेंबर), हाँगकाँग ओपन (16-21 नोव्हेंबर) या महत्त्वाच्या स्पर्धा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. कनिष्ठ विभागात ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये होणारी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप लांबणीवर टाकण्यात आली आहे. ‘दुर्दैवाने यावर्षी चीनमध्ये कोणतीही स्पर्धा भरविणे योग्य ठरणार नाही. तसेच त्यासाठी नवीन तारखा आणि केंद्र निश्चित करणेही कठीण आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.









