कोल्हापुर फुटबॉलमधील संभाव्य संघर्षाला पूर्णविराम; मॅरेथॉन बैठकी ठरल्या महत्वाच्या; तालीम, मंडळे आणि संघ प्रमुखांची उपस्थिती
संजीव खाडे कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघ निवड समितीतील एक ज्येष्ठ सदस्याच्या समर्थकाकडून कृती समितीच्या एका पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर बुधवारी कोल्हापुरी फुटबॉलमधील वातावरण चांगलेच तापले होते. दोन पेठांमध्ये संघर्ष उफाळून येतो की काय ? अशी स्थिती निर्माण झाली होती. गतकाळातील कटू आठवणींचीही चर्चा रंगली होती. पण स्फोटक वातावरणाचा अंदाज आलेल्या केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी प्रसंगावधान राखत घेतलेला पुढाकार निर्णायक ठरला. त्यांनी दोन्ही पेठांतील प्रमुख तालीम संस्था, मंडळे आणि फुटबॉल संघांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेत शब्द देत आणि शब्द घेत केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे कोल्हापुरी फुटबॉलमधील संभाव्य वाद वाढण्याऐवजी शांत झाला.
कृती समितीच्या पदाधिकाऱयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिवाजी विद्यापीठात माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज केला होता. त्यामध्ये फुटबॉल संघ निवड समितीतील एका अनुभवी सदस्याच्या नियुक्तीविषयी माहिती मागितली होती. संबंधित सदस्य आपल्या पेठेतील एक संघ बळकट करण्यासाठी दुसऱया एका पेठेतील संघांच्या खेळाडूंना विद्यापीठ आणि राज्य संघात निवड करण्याचे आमिष दाखवत असल्याची तक्रार दुसऱया पेठेतील काही संघांनी कृती समितीच्या पदाधिकाऱयाकडे केली होती. त्यातून त्या सदस्याच्या नियुक्तीची माहिती मागविणारा अर्ज कृती समितीच्या पदाधिकाऱयाने केला होता. माहिती अर्जावर विद्यापीठाने माहिती दिली नाही. मात्र संबंधित सदस्याची पुन्हा निवड समितीवर नियुक्ती झाली. त्यामुळे कृती समितीने विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित सदस्याच्या समर्थकांनी कृती समितीच्या पदाधिकाऱयाला मारहाण केली. या प्रकारानंतर संबंधित पदाधिकाऱयाने पोलिसांत तक्रार देणे टाळले. तरीही दोन पेठांमधील वातावरण चांगलेच तापले. दोन्ही बाजूंनी आपल्या बाजूचे समर्थन सुरू केले. पत्रकार परिषद, बैठक घेऊन बदला घेण्याची भाषाही सुरू झाली. ज्या दोन्ही व्यक्तींतून (निवड समिती सदस्य, कृती समिती पदाधिकारी) वादाला सुरू झाली. त्या बाजूला राहिल्या. दोन पेठांत संघर्षाची ठिणगी पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली. काहींनी चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या पेठां-पेठांतील संघर्षाची आठवण काढत पडद्यामागून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्नही सुरू (गरम डाव) केला. पेठांच्या स्वाभिमानाची भाषा सुरू झाली. तापत चाललेल्या वातावरणामुळे सध्या सुरू झालेल्या स्थानिक फुटबॉल हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती.
या साऱ्या स्फोटक वातावरणाचा अंदाज आलेल्या मालोजीराजे यांनी तातडीने हालचाली करत गुरूवारी सकाळपासून मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला. दोन्ही पेठां-पेठांतील तालमी, मंडळे, संघांच्या प्रमुख कार्यर्त्यांना थेट न्यू पॅलेसवर निमंत्रित करून चर्चा घडवून आणली. त्यांच्या व्यथा, वेदना आणि तक्रारी ऐकून घेतल्या. काही दुरूस्त्या करण्याचाही शब्द दिला आणि सलोखा ठेवण्याचा शब्द घेतला. दोन्ही पेठांकडून शब्द मिळाल्याने तापलेले वातावरण शांत झाले. मालोजीराजेंची शिष्टाई एक प्रकारने यशस्वी झाली.
संघर्ष नको, एकजूट ठेवा : मालोजीराजे
दोन्ही पेठांतील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीत मालोजीराजे यांनी तक्रारी ऐकून घेत आपले विचार मांडले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळी मैदानाबाहेरील ईर्ष्या, संघर्ष आणि वादाने कोल्हापुरी फुटबॉलचे नुकसान झाले आहे. त्याची पुनरावृत्ती झाली तर फुटबॉलचे आणि गुणवान फुटबॉलपटूंचे नुकसान होऊ शकते. पेठां-पेठांतील आपण सर्व एकमेकांचे पाहुणे, मित्र आहोत, कॉलेजलाही आपण एकमेकांच्या पेठांत जात असतो. माग वाद कशासाठी. वादामुळे जर प्रशासनाने हंगामावर बंदी घातली तर लाखो रूपये खर्च करून संघ बांधलेल्या संघांचे आणि खेळाडूंचे नुकसान होणार आहे. आज कोल्हापुरी फुटबॉल देशाच्या नकाशावर आहे. तो आणखी विकसीत करायचा असेल तर भाविष्याचा विचार करावा लागेल. खेळाडूंच्या निवडी मेरिटवर होतात. केएसएमध्येही विशिष्ट पेठ आणि तेथील आहे म्हणून निर्णय घेतला जात नाही, योग्य आणि न्याय्य निर्णय घेतला जातो. एखाद्या प्रकारामुळे संपूर्ण फुटबॉलमध्ये वाद करणे योग्य नाही, ती आपली संस्कृतीही नाही. दोन्ही पेठांतील कार्यकर्त्यांनी वाद न वाढविण्याचा आणि फुटबॉलच्या विकासात योगदान देण्याचा शब्द मला दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आ









