प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले. रविवारी रात्री सिव्हील हॉस्पीटलमधील 2 नवजात बालकांसह जिल्हा कारागृहातील एक कैदी व एका पोलीस कर्मचाऱयाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, रविवार सायंकाळपासून 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधीतांची एकूण संख्या 580 झाली आहे.
कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 3, समाजकल्याण रत्नागिरी 1, जिल्हा रुग्णालय 1 आणि पेढांबे येथून 2 अशा 7 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 437 झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखाली असलेल्या रूग्णांची संख्या 118 आहे.
रविवारी रात्रीपासून पॉझीटीव्ह अहवाल आलेल्या 20 जणांमध्ये रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथील 3, जेल रोड 2, मालगुंड 1, गावडे आंबेरे 1, राजिवडा 1, खेडमध्ये घरडा कॉलनी लवेल 6 व कुभारवाडा 1, चिपळूण तालुक्यात पायरवाडी कापसाळ 2, पेठमाप 1, गोवळकोट 1 व जुनी कोळकेवाडी येथील एकाचा समावेश आहे.
2 नवजात बालकांना लागण
चार दिवसांपूर्वी सिव्हीलमधील प्रसुती विभागातील एक नर्स पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी याच विभागातील 5 मातांचेही रिपोर्टही पॉझिटीव्ह आले होते. रविवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये याच विभागातील 2 नवजात शिशुंचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने सिव्हील प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रसुती विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे.
जिल्हा कारागृहातील कॉन्स्टेबल यापुर्वी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर कारागृह प्रशासन चांगलेच हतबल झाले होते. कारागृहात सोशल डिस्टस्टींगसह, सॅनिटायझर सिस्टीमही कार्यान्वित करण्यात आली होती. संबंधित रूग्ण चिपळूणमधून प्रवास करून आला होता, त्यानंतर क्वारंटाईन न होता कारागृहात दोन दिवस डय़ुटीला होता. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर सर्व कर्मचारी आणि कैदय़ांना देखरेखीखाली ठेवत काहींचे स्वॅबही घेण्यात आले होते. यामध्ये एका कैद्याचा व एका पोलीस कर्मचारी अशा दोघांचे अहवाल रविवारी रात्री पॉझिटीव्ह आले आहेत.
पहिल्या पॉझिटीव्ह कारागृह पोलीस कर्मचाऱयाच्या पत्नी, मुलग्याचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आणखी एका कर्मचाऱयाला लागण झाल्याने कर्मचारी वसाहतही क्वारंटाईन करण्यात आली आहे.
माता-बालकांची प्रकृती स्थिर
सिव्हीलमधील 5 मातांसह 2 पॉझिटीव्ह नवजात बालकांची प्रकृती स्थिर असून खबरदारी म्हणून इतर मातांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.
रत्नागिरीत 7 नवे कंटेन्मेंट झोन
सोमवारी साळवी स्टॉप, उद्मनगर, मारुतीमंदीर, चर्मालय, भाटये, टिवंडेवाडी शिरगाव, बौध्दवाडी-मिरजोळे अशी सात ठिकाणे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, झाडगाव नाका, मौजे साखरतर, मौजे मेर्वी, मौजे धामणसे, मौजे नरबे, मौजे लाजूळ, मौजे देवूड, मौजे उक्षी, मौजे नाणीज, मौजे भंडारपुळे,मौजे करबुडे कोंड, मौजे कशेळी, राजिवडा, मौजे नाचणे शांतीनगर, मौजे गणेशगुळे येथील कंटेन्मेंट झोनचा कालावधी पूणं झाल्याने तेथील सीमा पुर्ववत करण्यात आल्या.









