स्वगृही पोहोचविण्यासाठी मनपा प्रशासनाची धावपळ; आज 50 बसेस दाखल होणार असल्याची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यांतर्गत अडकून पडलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी राज्य सरकारने मुभा दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात बेंगळूरहून 41 बसेसमधून 1230 नागरिक बेळगावात दाखल झाले आहेत. अचानक दाखल झालेल्या नागरिकांमुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱयांची तारांबळ उडाली. रात्री-अपरात्री आलेल्या नागरिकांना राहण्याची व्यवस्था करावी लागली. चार ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नोकरी, व्यवसाय तसेच विविध कामासाठी बेंगळूरला गेलेले नागरिक लॉकडाऊनमुळे अडकले होते. काही कुटुंबे देखील पै-पाहुण्यांच्या घरी अडकून पडली होती. राज्यांतर्गत अडकून पडलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे हजारो लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. बेंगळूर व मंगळूरच्या जिल्हा प्रशासनाने परिवहन बसेसच्या माध्यमातून स्वगृही जाणाऱयांची रवानगी केली आहे. त्यामुळे केवळ दोन दिवसात बेंगळूरहून बेळगाव जिल्हय़ात 1230 नागरिक दाखल झाले आहेत.
रविवारी रात्री 6 बस येणार असल्याची माहिती बेंगळूर जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्यानुसार महानगरपालिकेने 200 नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र रविवारी मध्यरात्री आणखीन 10 बसने 300 नागरिक दाखल झाले. त्यामुळे मनपा अधिकाऱयांची तारांबळ उडाली. सकाळी 6 पर्यंत या सर्व बसमधून इतके नागरिक आल्याने त्यांना ठेवण्याची तसेच चहा-नाश्त्याची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर सर्व नागरिकांची आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली.
तसेच सोमवारी 15 बसेस येणार असल्याचे सांगण्यात आले. पण मंगळवारी सकाळपर्यंत 25 बसेस बेळगावात दाखल झाल्या. तर मंगळूरहून एक बस आली आहे. गेल्या दोन दिवसात 41 बसेसमधून 1230 नागरिक स्वगृही जाण्यासाठी बेळगावात दाखल झाले. त्यांना सकाळी नाश्त्याची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली. पण अचानकपणे बेळगावात दाखल झालेल्या नागरिकांना नाश्ता, जेवण व लहान मुलांसाठी दूध-बिस्किटे उपलब्ध करताना मनपा अधिकाऱयांची दमछाक होत आहे.
आरोग्य खात्याच्या पथकाद्वारे सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून बस आणि खासगी वाहनांद्वारे घरी सोडण्यात आले. चिकोडी, संकेश्वर, निपाणी, कित्तूर, खानापूर, गोकाक, अथणी, बैलहोंगल अशा विविध भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश होता. सकाळी 7 पासून आरोग्य तपासणी करून केएसआरटीसी बसने त्यांना पाठविण्यात आले. बेंगळूरमधून मंगळवारी शेकडो बसद्वारे नागरिक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यामुळे बेळगावला 50 बसेस दाखल होण्याची शक्मयता आहे.









