प्रतिनिधी / सातारा :
शाळा सुरु नसल्या तरी शिक्षण सुरु आहे. शालेय शिक्षणाची पाठयपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसात पोहचविण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या मालवाहतूक बसेसमधून पुस्तके पोहच केली जात आहेत. सातारा जिह्यासाठी 13 लाख 30 हजार 267 पुस्तके आलेली असून ती दोन दिवसात विद्यार्थ्याच्या हातात पोहचतील, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. शिक्षणामध्ये कोणताही व्यत्यय वा खंड पडलेला नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यांना नियमित अभ्यासक्रमांची पुस्तके पोहचवण्याचे काम सुरु झाले आहे. तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके आलेली असून तालुक्याच्या ठिकाणाहून केंद्राच्या ठिकाणी ही पुस्तके पोहचवण्यासाठी एसटी बसेच्या ट्रकमधून ही पुस्तके पोहच केली जात आहेत. सातारा जिह्यासाठी 13 लाख 30 हजार 267 पुस्तके आलेली असून 309.36 टन त्यांचे वजन आहे. दोन दिवसात ही पुस्तके केंद्रावर पोहचून केंद्र प्रमुखांमार्फत संबंधित शाळेवर आणि शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहच होतील. कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही, असे चोपडे यांनी सांगितले.









