सावंतवाडी:
गेल्या चार दिवसांपासून कोरोना लस उपलब्ध न झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद आहे. पुढील दोन दिवसात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना लस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध होते. आतापर्यंत आलेल्या लसीचा पुरवठा नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आला. जसजसा प्रशासनाकडून साठा उपलब्ध झाला तसे लसीकरण करण्यात आले. लस गेल्या चार दिवसांपासून उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले. गर्दी होत असल्याने नागरिकांच्या माहितीसाठी लसीकरण केंद्रावर लस नसल्याचा फलक लावावा लागला आहे. जिल्हय़ातच लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. त्यामळे आता जिल्हय़ासाठी लस मिळण्याची आशा आहे. जिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात ही लस मिळेल अशी अपेक्षा आहे. लस आल्यानंतर लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.









