प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयाची इमारत ही 30 वर्षांची असून अद्यापही याचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. याची पूर्तता 14 जानेवारीपूर्वी करावी तसेच फायर ऑडिटही येत्या 2 दिवसात करावे, या सगळय़ा बाबींचा पुन्हा एकदा आढावा घेण्यासाठी 14 जानेवारीला जिल्हा रूग्णालयात बैठक घेणार आहे. त्यामुळे पुढच्यावेळी कोणतीही कारणे मला देवू नका, असे सांगतानाच कोरोनाचे नियम सिव्हीलमध्ये पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करून रूग्णांच्या सुरक्षितता व सेवेला प्राधान्य द्या, असे खडेबोल मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा रूग्णालय प्रशासनाला सुनावले.
भंडारा जिल्हा रूग्णालयातील बालरूग्ण विभागाला आग लागून 10 बालकांचा दुर्दैवी अंत झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व जिल्हा रूग्णालयाचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी अचानक मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट नाही, फायर ऑडिट नाही, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याच्या गंभीर त्रुटी समोर आल्याने मंत्री सामंत यांनी सिव्हील प्रशासनाला धारेवर धरले. अचानकपणे दिलेल्या भेटीनंतर अनेक त्रुटी समोर आल्या.
20 खाटांच्या बालरूग्णालयाची पाहणी करण्यासाठी सामंत गेले असता येथे रूग्णांपेक्षा नातेवाईकांची गर्दी दिसली. इतकेच नव्हे तर कर्मचाऱयांसह नातेवाईकांनी मास्क लावले नसल्याचेही दृष्य पहावयास मिळाले. आपण आत गेल्यावर आणखीन गर्दी होवू नये, यासाठी सामंत हे बाहेरूनच जिल्हा शल्य चिकित्सक दालनात गेले. येथे शासकीय रूग्णालय प्रशासनाची बैठक घेतली असता बालरोग तज्ञांसह अनेक अधिकारी अनुपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेरखाने यांना यासंदर्भात सामंत यांनी जाब विचारत सुनावले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांमध्येच समन्वय नसल्याचे स्पष्ट वक्तव्य सामंत यांनी केले. 14 जानेवारीला पुन्हा जिल्हा रूग्णालयातील विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेणार आहे. तोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करून घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.
सिव्हीलमध्ये मास्क न वापरणारे अनेकजण आढळल्याने मंत्री सामंत यांनी या बाबत संताप व्यक्त केला. अद्यापही कोरोना संपलेला नाही. रूग्णसंख्या कमी झालेली असली तरी काळजी व खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाची संख्या शासकीय रूग्णालयातच अधिक वाढू शकेल, अशी भीतीही त्यांनी रविवारी घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली.
रूग्णालयातील प्रश्नांचा पाठपुरावा करणार
जिल्हा रूग्णालयातील दूरध्वनी क्रमांक अनेक दिवसांपासून बंद असून आधी हा दूरध्वनी दुरूस्त करून घ्या, प्रत्येकवेळी रूग्ण कोणाला संपर्क करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करतानाच या सगळय़ा प्रश्नांचा पाठपुरावा आपण करणार आहे. 14 तारखेपर्यंत या सर्व प्रस्तावाबाबत तातडीने निर्णय घेवून अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.