बेंगळूर : पुढील दोन दिवसात राज्याला मोठय़ा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. जिल्हय़ांमधील लोकसंख्येनुसार लसींचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली. शुक्रवारी शिमोगाच्या शिकारीपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
येडियुराप्पा पुढे म्हणाले, पुढील आठवडय़ात कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा खाली येण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना केली आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी सरकारकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे संकटात असलेल्या गरिबांना सरकार आर्थिक मदत करत आहे. अशा परिस्थितीत बँकांनी लाभार्थींच्या खात्यावर होणारी रक्कम कर्जांचे हप्ते भरण्यासाठी जमा करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.









