प्रतिनिधी/ मडगाव
रुमडामळ आणि माडेल-फातोर्डा येथे वेगवेगळ्या खून प्रकरणातील तिन्ही कर्नाटकी आरोपींना कर्नाटकात जाऊन जेरबंद करण्यात आले आहे. रुमडामळ येथील खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी कर्नाटकातील सौनूर येथे जाऊन दोन आरोपींना तर फातोर्डा येथील खूनप्रकरणी कर्नाटकातील बागलकोट येथे जाऊन एका आरोपीला जेरबंद केले.
रुमडामळ -दवर्ली येथे 1 सप्टेंबर 2023 रोजी सादीक पीरसाब बेल्लारी (22) याचा सुऱ्याने वार करुन खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी मायणा -कुडतरी पोलिसांनी कर्नाटकातील सौनूर येथे जाऊन तौसिफ दस्तगीर कादेमणी (20) व कादर खान खनजादे (28) या दोघांना जेरबंद करण्यात आले, अशी माहिती मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.
खुनानंतर तपासकाम हाती घेतले तेव्हा दोन संशयितांची नावे पोलिसांना समजली. पोलीस तपासात हे दोन्ही संशयित कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सौनूर या गावी असल्याचे आढळून आले. त्यानुसार मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देसाई व त्यांचे इतर सहकारी शुक्रवारीच कर्नाटकातील सौनूर येथे गेले आणि शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता आरोपींना जेरबंद करुन गोव्यात आणण्यात आले.

रुमडामळ येथील खुनाचे कारण
पूर्ववैमनस्यातून सादीक पीरसाब बेल्लारी याचा खून करण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी स्पष्ट केले आहे. सादीक पीरसाब बेल्लारी याचा खून केल्याची कबुली या दोन्ही आरोपींनी दिली असल्याचे या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
माडेल-फातोर्डा येथे एक व्यक्ती मृतावस्थेत दिसल्याने स्थानिकांनी याची माहिती फातोर्डा पोलिसांना दिली होती. डोक्यावर दगड घालून खून करण्यात आला असल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले तेव्हा आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु झाला.
पोलिसांनी तपासकामाला हात घातला तेव्हा काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यावर दगड हाणत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. हा प्रकार 30 ऑगस्ट रोजी उघड झाला. त्यानंतर शवविच्छेदनात डोक्यावर दगड घालूनच खून करण्यात आला हे स्पष्ट झाले होते.
सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस तपास सुरू झाला. पोलीस तपासात आरोपी बागलकोट येथे असल्याचे दिसून आल्यानंतर फातोर्डा पोलीस कर्नाटकातील बागलकोट येथे गेले आणि वीरेश यल्लप्पा मदार (28) याला जेरबंद करण्यात आले.
फातोर्डा खुनाचे कारण
माडेल -फातोर्डा येथे खून करण्यामागील कारण अत्यंत क्षुल्लक होते. ‘मी ज्या ठिकाणी झोपत होतो त्या ठिकाणी त्या रात्री तो (अज्ञात व्यक्ती) झोपल्यामुळे मी त्याच्या डोक्यात दगड घातला’ असे आरोपी वीरेश यल्लप्पा मदार याने पोलिसांना सांगितले.
आरोपी मदार याला शनिवारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्याला 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या 9 दिवसांच्या कालावधीत आरोपीला बरोबर घेऊन पोलीस या खून प्रकरणासंबंधी पुरावा गोळा करण्याची शक्यता आहे.
दोन्ही खून प्रकरणाचा छडा काही तासातच लावल्यामुळे गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे









