@ प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दीड महिन्यात घडलेल्या दोन खुनांचे गुढ उकलण्यात पोलीस दलाला अद्याप यश आले नाही. तपास सुरू आहे असे पोलीस अधिकारी सांगत असले तरी दोन्ही प्रकरणांत ठोस सुगावा मिळाला नाही. त्यामुळे खून प्रकरणांचे गुढ कायम असून या परिस्थितीमुळे खुनी मोकाट सुटले आहेत.
सोनट्टी व कबलापूरजवळ घडलेल्या खून प्रकरणांचा तपास सुरू आहे. सर्व शक्मयता गृहीत धरुन तपास हाती घेतले तरी ठोस सुगावा तपास अधिकाऱयांच्या हाती लागला नाही. काकती व मारिहाळ पोलीस स्थानकात या खून प्रकरणांची नोंद झाली असून खुन्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असले तरी गुढ उकलण्यात मात्र यश आले नाही.
सोनट्टी येथील एका फार्महाऊसवर 28 ऑक्टोबर 2020 रोजी लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45) या रखवालदाराचा खून करण्यात आला आहे. त्याच्या मुलाने काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून लक्ष्मण हा मुळचा बैलहोंगल तालुक्मयातील हन्नीकेरीचा राहणारा होता. सोनट्टी जवळील सुनील पाटील यांच्या फार्म हाऊसवर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही.
दुसरी घटना 26 नोव्हेंबर रोजी कबलापूर (ता. बेळगाव) जवळ उघडकीस आली आहे. निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31, मुळचा रा. उदगीर, जि. लातूर) या खासगी कंपनीत काम करणाऱया युवकाचा मृतदेह आढळून आला. 25 नोव्हेंबर रोजी रात्री अपहरण करुन अज्ञातांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
अपहरणानंतर काही काळ कणबर्गीजवळ त्याला नेण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून करुन त्याचा मृतदेह कबलापूरजवळ टाकून देण्यात आला होता. या पलिकडे कसलीच माहिती पोलीस तपासात मिळाली नसल्याचे समजते. 3 डिसेंबर रोजी उदगीर येथील निशिकांतचे कुटुंबिय बेळगावला आले होते. मारिहाळ पोलिसांनी त्यांची जबानी घेतली आहे. या पलिकडे खून प्रकरणाच्या तपासात कसलीच प्रगती झाली नाही. या संबंधी गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांच्याशी संपर्क साधला असता या खून प्रकरणांचा तपास सुरू आहे. तपास अधिकाऱयांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर मारेकऱयांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रयत्नांना यश येईल, असे त्यांनी सांगितले.









