स्टोक्स, रॉबिन्सन, हमीद यांचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ लंडन
भारताविरुद्ध होणाऱया पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लंडने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली असून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स तसेच वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनचेही या संघात पुनरागमन झाले आहे. एका जुन्या वर्णद्वेषी ट्विटमुळे रॉबिन्सनवर याआधी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
2016 मध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळलेला सलामीवीर हसीब हमीद यालाही या संघात स्थान मिळाले आहे. पाच कसोटींच्या मालिकेतील पहिली कसोटी नॉटिंगहॅम येथे 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे तर दुसरी कसोटी लॉर्ड्सवर 12-16 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया झालेला जोफ्रा आर्चर व घोटय़ाच्या दुखापतीतून अद्याप पूर्ण बरा न झालेला ख्रिस वोक्स यांचा निवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही. मार्क वूड व सॅम करन हे या संघातील अन्य दोन जलद गोलंदाज असून ते जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी गोलंदाजांना साथ देतील.

अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत रॉबिन्सनने पदार्पण केले होते. पण सात वर्षांपूर्वी त्याने केलेले वर्णद्वेषी ट्विट पुन्हा समोर आल्याने ईसीबीने त्याची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी त्याच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळण्यास निर्बंध घातले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आलेले जॉनी बेअरस्टो व जोस बटलरदेखील संघात पुन्हा परतले आहेत. याशिवाय रोरी बर्न्स, ऑली पोप, झॅक क्रॉले, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स या फलंदाजांनाही संघात स्थान मिळाले आहे. 24 वर्षीय सलामीवीर हमीदचे पुनरागमन मात्र लक्षवेधी ठरले आहे. तो सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यात कौंटी इलेव्हन संघातून खेळत आहे. टीनेजमध्ये असताना तो माजी सलामीवीर जेफ्री बॉयकॉटप्रमाणे अतिशय बचावात्मक फलंदाजी करायचा. त्यामुळे त्याला बेबी बॉयकॉट असे संबोधले जायचे. तो आता पाच वर्षांनंतर संघात पुनरागमन करणार आहे.
पहिल्या दोन कसोटीसाठी निवडलेला इंग्लंडचा संघ ः जो रूट (कर्णधार), अँडरसन, स्टोक्स, बेअरस्टो, बेस, ब्रॉड, बर्न्स, बटलर, क्रॉले, सॅम करन, हसीब हमीद, लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, सिबली, मार्क वूड.









