कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमची तत्परता
प्रतिनिधी / देवबाग:
कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर यांनी जाळय़ात अडकलेल्या दोन अजगरांना जीवदान दिले.
वायरी भूतनाथ येथील केळुस्कर यांच्या माळरानावरील आंबा बागेत तब्बल अकरा फूट लांबीचा अजगर जाळय़ात अडकलेल्या स्थितीत गुरुवारी सायंकाळी आढळला. तर दुसरा अजगर कळेथर येथील बाबू सारंग यांच्या परसबागेत आढळला. दोन्ही अजगरांना कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर यांनी तातडीने धाव घेत त्यांची जाळ्य़ातून सुटका केली. त्यांची काळजी घेत दोन्ही अजगरांना शुक्रवारी आंबोली येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
समुद्री कासवाची जाळय़ातून सुटका
वायरी दांडी येथील जॉलीस फर्नांडिस हे शुक्रवारी 14 वाव खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना त्यांच्या जाळय़ात ऑलिव्ह रिडले जातीचा प्रौढ मादी कासव सापडला. या कासवाची कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमच्या सदस्यांनी सुटका करत कासवावर प्रथमोपचार करून त्याला समुद्रात सोडून दिले. यावेळी संस्थेचे आनंद बांबार्डेकर, नंदू कुपकर, अनिल गावडे, वैभव अमृसकर, महेश राऊळ, डॉ. कमलेश चव्हाण, दर्शन वेंगुर्लेकर उपस्थित होते. फर्नांडिस यांच्या जाळय़ांचे नुकसान झाले. डॉ. कमलेश चव्हाण यांनी कासवावर प्रथमोपचार केले.









