क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील पहिल्या उपान्त्य लढतीतील फर्स्ट लेग सामना 2-2 असा बरोबरीत संपला. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या रंगतदार सामन्यात मुंबई सिटीने दोन वेळा पिछाडीवर राहून एफसी गोवाला बरोबरीत रोखले. गोव्यासाठी या सामन्यात दोन पेनल्टीचे निर्णयही विरोधात गेले.
एफसी गोवासाठी इगोर अँग्युलो आणि सावियर गामाने तर मुंबई सिटीचे गोल हय़ुगो बुमूस आणि मूर्तादा फॉल यांनी केले. आता 8 मार्च रोजी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात दुसरा उपान्त्य लेग सामना खेळविण्यात येईल.
सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला एफसी गोवाने धोकादायक चाल रचली. यावेळी जॉर्गे ऑर्तिजने दिलेल्या पासवर सावियर गामाने हाणलेला फटका मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने अडविला व संघावर होणारा गोल टाळला. त्यानंतर मुंबईच्या बिपीन सिंगने ऍडम फोंड्रेच्या पासवर गोल करण्याची संधी दवडली.
सामन्याच्या 19 व्या मिनिटाला एफसी गोवाने पेनल्टीवर गोल करून आघाडी घेतली. यावेळी मंदार राव देसाईने ऑर्तिजला बॉक्समध्ये पाडल्याने मिळालेल्या पेनल्टीवर इगोर अँग्युलोने गोलरक्षक अमरिंदरला भेदले व गोल केला. लगेच 23 व्या मिनिटाला ऑर्तिजचा गोल करण्याचा यत्न वाया गेल्यानंतर 26 व्या मिनिटाला एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगने उत्कृष्ट गोलरक्षण करून संघावर होणारा गोल टाळला. यावेळी त्याने हय़ुगो बुमूसच्या पासवर बार्थोलॉमियाँवचा अगदी जवळून हाणलेला फटका धीरजने पंच करून बाहेर टाकला.
34 व्या मिनिटाला एफसी गोवाचा बचावपटू सॅरिटोन फर्नांडिसला लचक भरल्याने मैदान सोडावे लागले. यामुळे गोव्याचा बचाव काही प्रमाणात ढिला पडला. 38 व्या मिनिटाला बचावफळीतील ढिलाईचा फायदा घेत हय़ुगो बुमूसने धीरज सिंगला भेदले आणि मुंबई सिटी एफसीचा बरोबरीचा गोल केला.
दुसऱया सत्रात एफसी गोवाच्या सावियर गामाने लांब पल्ल्यावरून गोल केला आणि एफसी गोवाला परत एकदा आघाडीवर नेले. गोव्याची बचावफळी मुंबई सिटीच्या प्रत्येक आक्रमणावेळी भेदक वाटत होती. बार्थोलॉमियाँव ओगबेचे, ऍडम फोंड्रे आणि अहमद जाहूने वेळोवेळी एफसी गोव्याची बचावफळी भेदली. सॅरिटोन फर्नांडिस तसेच इव्हान गोंझालेझची अनुपस्थिती संघाला प्रकर्षाने जाणवली. अशाच एका बचावफळीतील ढिलाईचा फायदा घेत मुंबई सिटी एफसीने परत एकदा पिछाडीवरून बरोबरी साधली. यावेळी अहमद जाहूच्या क्रॉसवर ताबा घेत मुर्तादा फॉलने हेडरवर धीरजला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला.









