गांधी जयंती दिनाचे साधले औचित्य : बाळा धाऊस्कर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
वार्ताहर / दोडामार्ग:
गांधीजींची सत्य व अहिंसा ही विचारसरणी आजच्या आधुनिक काळातही फार उपयोगी ठरत आहे. आपल्या जीवनात गांधीजींचे विचार हे कधीच संपणार नसून येणाऱ्या प्रत्येक पिढीला विचार मार्गदर्शक ठरणार आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी तालुकाध्यक्ष बाळा धाउस्कर यांनी केले. म. गांधी जयंतीचे औचित्य साधत तहसीलदार कार्यालयानजीक आज दोडामार्ग शहर राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्री. धाऊस्कर बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत शहराध्यक्ष सुधीर गवस, संतोषकुमार दळवी, सुमंत मणेरीकर, सुधीर चांदेलकर, संतोष फाटक, शेखर फाटक, महादेव जाधव, अतुल गवस, मिथुन गवस, श्री. लबदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोषकुमार दळवी म्हणाले की, जय जवान जय किसान चा मंत्र देणारे लाल बहादूर शास्त्री व सर्व जगाला शांततेचा, मानवतेचा, सत्यवादी व अहिंसेचा संदेश देणारे गांधीजी या दोहोंचे विचार देशातील प्रत्येकाने जपले पाहिजेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुधीर गवस यांनी केले.