दोडामार्ग – वार्ताहर-
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना, सेवा ह्या नागरिकांच्या कल्याणासाठी प्रशासनातर्फे राबविल्या जातात त्या योजना व सेवा यांचा लाभ नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केले आहे. दोडामार्ग महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पानवेकर बोलत होते.
येथील तहसील कार्यालयात आयोजित शिबिराचे उदघाटन प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अरुण खानोलकर, नायब तहसीलदार सत्यवान गवस, मंडळ अधिकारी राजन गवस आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी पानवेकर पुढे म्हणाले की, एखादा दाखल काढण्यासाठी नागरिकांना जर समस्या जाणवली तर संबधित तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, तहसीलदार किव्हा थेट माझाशी संपर्क साधावा. जेणेकरून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल व सर्वाना या शासकीय योजना व सेवांचा लाभ घेता येईल असेही श्री. पानवेकर म्हणाले. या शिबिरात जवळपास चाळीस नागरिकांना विविध दाखले, शिधापत्रिका यांचे प्रांताधिकारी पानवेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांचे आभार मानले.









