महिलांसाठी होणार मार्गदर्शन
दोडामार्ग / वार्ताहर:
उद्या गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरासहित तालुक्यात 7 ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवामध्ये दोडामार्ग पोलिसांकडून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ ह्या स्वतः संबधित नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी जाऊन महिलांचे लैंगिक शोषण, बाल लैंगिक शोषण, महिला आत्मसरंक्षण, अत्याचार प्रतिबंध व सुदृढ आरोग्य या विषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. येथील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सौ. नदाफ तसेच अन्य महिला पोलीस वर्ग नेहमी आपली ड्युटी बजावत असतातच. त्याचबरोबर समाजाला प्रबोधन तसेच मार्गदर्शन करण्याचा अनुषंगाने त्यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवात एक वेगळे पाऊल उचलले आहे. दोडामार्ग शहरातील बाजारपेठेमधील पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव ठिकाणी त्या वरील विषयानुरूप मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आडाळी, हनुमान कला क्रीडा व्यायाम मंडळ साटेली, आर्यन्स युथ क्लब पिकुळे लाडाचे टेंब, सातेरी नवरात्र उत्सव मंडळ सासोली, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ साटेली सुतारवाडी, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भेडशी खालचाबाजार या ठिकाणी देखील जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा विशेषतः महिला वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.









