बिनविरोध निवड झाल्याने दुसऱ्यांदा उपसभापती पदावर लागली वर्णी
दोडामार्ग / वार्ताहर-
दोडामार्ग पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेच्या सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड झाल्याने दुसऱ्यांदा उपसभापती पदावर त्यांची वर्णी लागली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून तहसिलदार अरुण खानोलकर यांनी काम पाहिले.
दोडामार्ग पंचायत समिती उपसभापती पदावर यापूर्वी धनश्री गवस कार्यरत होत्या. मात्र पक्षश्रेष्टींच्या आदेशानुसार व सदस्य यांच्या ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणे सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी ११ मे रोजी या पदाचा राजीनामा दिला होता. महिनाभर हे पद रिक्तच होते. रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी सभापती संजना कोरगावकर, सदस्य धनश्री गवस, सुनंदा धर्णे, बाबुराव धुरी उपस्थित होते. सुनंदा धर्णे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्यात वाढत्या कोरोनावर उपाययोजना राबून तालुका कोव्हिडं मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सौ. धर्णे यांनी सांगितले.