जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधणार-नानचे
वार्ताहर / दोडामार्ग:
कोरोनाबाधित रुग्णांच्या देखभाल व उपचारांसाठी दोडामार्ग येथील आयटीआयमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा असून उपचारासाठी दाखल करण्यात येणाऱया रुग्णाच्या तक्रारी वाढल्या आहेत. या कोविड सेंटरची अवस्था एखाद्या कोंडवाडय़ासारखी असल्याची तक्रार रुग्णांची आहे. एकंदरीत या सगळय़ा प्रकारावरून तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असतानासुद्धा आरोग्य विभाग मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र आहे. दोडामार्गच्या बाजारपेठेत चार रुग्ण आढळूनसुद्धा त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची दोन दिवस झाले तरी टेस्ट होत नाहीत. यावरून आरोग्य विभाग नागरिकांच्या जीविताशी खेळत असून आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे भाजपच्यावतीने तक्रार करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी दिली.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात म्हटले आहे की, दोडामार्ग येथील आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे नावापुरतेच आहे. त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सुविधांची वानवा असल्याने उपचार घेणाऱया रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. रुग्णांना पाणी, चहा, नाश्ता, जेवण वेळेत मिळत नाही. सगळीकडे अस्वच्छता आहे. त्यामुळे याठिकाणी उपचार घेणाऱया रुग्णांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी केल्या जातात. मुळात दोडामार्ग तालुक्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या मोजक्याच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांवर सगळा भार असल्याने ते वरिष्ठांच्या दबावाखाली नाविलाजास्तव काम करीत असल्याचे जाणवते आहे. कोविड केअर सेंटरमध्ये पन्नास ऐवजी फक्त दहाच बेड आहेत. कार्यरत रुग्णवाहिका एकच आहे. ती पण 108 ची आहे. परिणामी आरोग्य विभाग यावर गंभीर नाही. तालुक्याच्या ठिकाणी दोडामार्ग शहरातील बाजारपेठेतील मध्यवर्ती भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून दोन दिवस झाले तरी त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास चाळीस जणांच्या टेस्ट अद्याप (सोमवारी दुपारपर्यंत) झालेल्या नाहीत. अशाप्रकारे आरोग्य विभाग दोडामार्गवासीयांच्या जीवाशी खेळत आहे. या नियोजनशून्य कारभाराविरोधात दोडामार्ग भाजपतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.









