जिल्हय़ात 800 हून अधिक जणांच्या मृत्यूस प्रशासन, पालकमंत्रीच जबाबदार!
वार्ताहर / दोडामार्ग:
सिंधुदुर्ग जिल्हा सध्या रेडझोनमध्ये असून दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढतच आहे. याबरोबर जिह्यात आठशेहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहे. या सर्वाला जबाबदार प्रशासन व जिह्याचे पालकमंत्री आहेत, असे सांगत मंगळवारी भाजपच्या पदाधिकाऱयांनी प्रशासनाचा निषेध करत दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करीत निवेदनही तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे सादर केले.
दोडामार्ग भाजपच्यावतीने प्रशासनाचा निषेध करत हे आंदोलन कोविडचे सर्व नियम पाळून करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, पं. स. सदस्य बाळा नाईक, दोडामार्गचे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, कोनाळ सरपंच पराशर सावंत, रंगनाथ गवस, संजय उसपकर आदी उपस्थित होते.
तहसीलदार खानोलकर यांना दिलेल्या निवेदनात भाजपने पुढे असे म्हटले आहे की, जिल्हय़ात पॉझिटिव्हीटी दराच्या आकडय़ांचा खेळ थांबवून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णासंबंधाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होण्यासाठी कठोर व प्रामाणिक प्रयत्न करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा सुरू असतानाही केवळ रॅपिड टेस्टचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना दिला जाणारा त्रास त्वरित बंद करण्यात यावा. शासकीय व्यवस्थेत विविध मशिनरी येत आहे. पण, ऑपरेटर कधी देणार ? उदाहरणार्थ, व्हेंटिलेटर आणले. पण, ते लावायला आणि त्यावर लक्ष द्यायला तज्ञ केव्हा उपलब्ध करणार ? विशेषतः डॉक्टरांची व्यवस्था, त्यातही हे हाताळण्यासाठी फिजीशियन उपलब्ध करुन देण्यात यावेत. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यानचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मृत्युमुखी पडले आहेत. यामागची नेमक्या कारणांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमण्यात यावी. फिजिशियन, डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी हे आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत. या सर्वांसोबत जीव धोक्यात घालून सेवा करणारे सरपंच, ग्राम सनियंत्रण समिती सदस्य, पत्रकार मित्र यांना मेडीक्लेम सेवा पुरविण्यात याव्यात, त्यांचे कोविड 19 लसीकरण पूर्ण करण्यात यावे. कोरोना, वादळ आणि मागील दोन वर्षात ढासाळलेली अर्थव्यवस्था यावर विचार करून जनतेला जगण्यासाठी श्वास देणारा निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय नियोजन करण्यात यावे व त्याची लवकरात लवकर अमंलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावी, यावेळी करण्यात आली. B









