दोडामार्ग /वार्ताहर-
दोडामार्गात तालुक्यातील कुंब्रल, तळकट, शिरवल वगैरे गावात बीएसएनएलची सेवा सुरळीत नसल्याकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी तेथील ग्रामस्थांना समवेत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. गणेश चतुर्थीपूर्वी बीएसएनएलची सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
तळकट येथे पूर्वीपेक्षाही नेटवर्कची क्षमता कमी झाली आहे. तर कुंब्रल, शिरवल, कोलझर येथे हायस्पीड असूनही मेसेजद्वारे संपर्क करता येत नाही. शिवाय आवश्यक वेळी फोटो डाऊनलोड होत नाहीत. बहुतांशी टॉवर्सकडे लाईट गेल्यानंतर बॅटरीची सुविधा नाही. या तसेच अन्य समस्यांकडे नाडकर्णी व ग्रामस्थांनी लक्ष वेधले. गणेश चतुर्थी जवळ येत असून अनेक चाकरमानी गावागावात येणार आहेत. ते लक्षात घेता चतुर्थीपूर्वी परिसरात बीएसएनएल मोबाइल नेटवर्कची सेवा सुरळीत करा असेही यावेळी सांगण्यात आले. येत्या 27 ऑगस्टपर्यंत सर्व तारीख तांत्रिक अडचणी दूर करून बीएसएनएलची सेवा सुरळीत केली जाईल असे आश्वासन बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी श्री. नाडकर्णी व ग्रामस्थांना दिले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, साटेली – भेडशी सरपंच लखू खरवत, सूर्यकांत गवस, सुरेंद्र सावंत, ब्रिजेश नाईक, भारत सावंत आदी अनेकजण उपस्थित होते.









