वार्ताहर / दोडामार्ग:
मूळ दोडामार्ग तालुक्यातील व सध्या नोकरीनिमित्त ठाणे येथील वास्तव्यास असलेल्या दोन युवती लॉकडाऊनमुळे त्यांच्या निवासस्थानी अडकल्या. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ही माहिती भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्षांच्या कानावर येताच त्यांनी सदर युवतींना धीर दिला व माजी खासदार नीलेश राणे यांच्याद्वारे थेट घरपोच जीवनाश्यक वस्तू पोहोचविल्या.
गोव्याप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील अनेक युवती मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त राहत आहेत. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे हे सर्वजण ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील अशाच दोन युवती ठाणे येथे नोकरी निमित्त कार्यरत आहेत. त्यांच्यासमोरही सध्याच्या परिस्थितीमुळे संकट उभे राहिले. खोलीच्या बाहेर पडता येईना तसेच जीवनाश्यक वस्तुंची टंचाई भेडसावू लागली. ही बातमी भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांना समजली त्यांनी तात्काळ या युवतींशी संपर्क साधत या युवतींना धीर दिला व लागलीच माजी खासदार राणे यांच्याशी संपर्क साधला. श्री. राणें यांनीही क्षणाचा विलंब न करता आपले मुंबईस्थित विजय त्रिपाठी यांना ठाणे येथे त्या युवतांकडे जीवनाश्यक वस्तुंसह पाठविले. तेव्हा युवतींनी खासदार नारायण राणे, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, विजय त्रिपाठी व संतोष नानचे यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.









