मुलीला शिकवा सक्षम…कुटूंब होईल भक्कम
दोडामार्ग दिवाणी न्यायालयाच्यावतीने ‘जागतिक कन्या’ दिनानिमित्त मार्गदर्शन
दोडामार्ग / प्रतिनिधी:
दोडामार्ग दिवाणी न्यायालयाच्यावतीने ‘जागतिक कन्या’ दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सकाळी जनजागृती प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा या फेरीत सहभाग होता. यावेळी “मुलीला शिकवा सक्षम…कुटूंब होईल भक्कम” अशा प्रबोधनपर घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी यांना ‘ महिला सक्षमीकरण’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अँड प्रवीण नाईक यांनी मुलगी, महिला यांच्या पासून ते गरोदर माता, स्तनदा माता यांच्यासाठीच्या शासकीय योजना, मुलीला आत्मसंवरक्षण किती आवश्यक असून कराटे प्रशिक्षण व अन्य बाबी विस्तारुन सांगितल्या. यावेळी सुदृढ़ समाज घडविण्यासाठी महिलांची भूमिकाही यावेळी स्पष्ट करून सांगण्यात आली. यावेळी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी अँड सोनू गवस, अँड प्रवीण नाईक, वकील संघटना अध्यक्ष अँड दाजी नाईक, अँड शैलेश धुरी आदीं उपस्थित होते. अँड सोनू गवस यांनी आभार व्यक्त केले.









