साहित्य : एक मध्यम आकाराचे दोडके, दोन चमचे मोहरीचे तेल, एक लाल सुकी मिरची, दोन ते तीन लसूण पाकळय़ा, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : दोडके धुवून कोरडे करावे. नंतर चमच्याच्या सहाय्याने त्याला मध्यम आकाराचे गोलाकार छिद्रे पाडावीत. संपूर्ण दोडक्यावर मोहरीचे तेल हाताच्या सहाय्याने पसरवून घ्यावे. आता दोडके गॅसच्या मंद आचेवर पंधरा मिनिटे परतवून घ्यावे. नंतर भाजलेले दोडके दहा मिनिटे गार पाण्यात ठेवावे. गॅसच्या मंद आचेवर लसूण पाकळय़ा आणि लाल सुकी मिरची परतवून घ्यावी. पाण्यात ठेवलेले दोडके बाहेर काढून पुन्हा कोरडे करावे. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून त्यात लसूण पाकळय़ा, लाल सुकी मिरची आणि मीठ घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. नंतर वरून थोडेसे कोमट केलेले मोहरीचे तेल आणि कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करावे. आता तयार भरीत चपाती अथवा पराठय़ासोबत खाण्यास द्या.









