मुंबई : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी दैवा यांनी आपल्या दोन नव्या स्मार्ट टीव्हींची घोषणा केली आहे. कंपनीने 49 इंची आणि 55 इंची 4 के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही भारतात दाखल केले आहेत. डीबीएक्स टीव्ही ऑडीयोसह 20 वॅट बॉक्स स्पीकरच्या वैशिष्टय़ासह स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत. अँड्रॉइड 9 टीव्ही ऑपरेटींग सिस्टमवर ए 55 क्वाड कोअर प्रोसेसरसह येणाऱया या टीव्हींमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेजची सोय असणार आहे. 49 इंची टीव्हीची किंमत 29 हजार 990 रुपये तर 55 इंची टीव्हीची 34 हजार 499 रुपये किंमत असेल. नेटफ्लिक्स, प्राइम व्हीडीओ व युटय़ूबचा आनंद या टीव्हींवर घेता येतो. सदरच्या टीव्हींवर दोन वर्षांची वॉरंटी असणार आहे.
टाटा स्टीलला 2 हजार कोटींचा तोटा शक्य

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी टाटा स्टीलला पहिल्या तिमाहीत तब्बल 2 हजार कोटींचा तोटा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत हा तोटा दिसेल अशी शक्यता सांगितली जात आहे. कंपनीला 2 हजार 393 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. तिकडे शेअरबाजारात टाटा स्टीलच्या समभागात घसरण झालेली पाहायला मिळाली. 24 मार्चनंतरच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर पोलादाची मागणी कमालीची घटली होती. स्थानिक बाजारातील पोलादाची मागणीही बऱयापैकी कमी झाली आहे. वर्षाच्या तुलनेत 56 टक्के इतकी कपात दिसली आहे.
यामाहाचा आता ऑनलाइन विक्रीवर भर

मुंबई : जपानमधील दुचाकी कंपनी यामाहाने भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वाहन विक्रीस सुरूवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ऑनलाइन विक्रीवर भर देण्याचे यापुढे ठरवले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कंपनीने असा निर्णय घेतला आहे. सध्याला ग्राहक घरीच राहणे पसंत करत आहेत. कंपन्यांच्या शोरूमलाही कमी प्रमाणात ग्राहक भेट देत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांची यातून गैरसोय होऊ नये म्हणून संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन वाहन विक्रीवर भर देण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. याअंतर्गत ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.









