वार्ताहर / गोकुळ शिरगाव
दैनिक तरुण भारत वितरणचे प्रतिनिधी अजय पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल यश बेकर्स व त्यांचा कर्मचारीवर्ग यांच्याकडून त्यांचे अभिनंदन व आभार मानले.
कणेरी तालुका करवीर येथे यश बेकर्सची मोठी बेकरी असून या बेकरीतून दर दिवशी संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभर बेकरी उत्पादन पाठवले जाते. आज पहाटे यश बेकरीचे कर्मचारी विजय जगन भोसले (राहणार कणेरीवाडी ) हे बेकरी चा माल आपल्या गाडीतून (टेम्पो ) घेऊन जात असताना गडबडीत त्यांच्याकडून बेकरीचा सर्व हिशोब व पैशाचे असलेली बॅग दसरा चौक येथे पडली होती. ही बॅग दैनिक तरुण भारतचे वितरण प्रतिनिधी अजय पाटील यांना सकाळी सापडली. अजय पाटील यांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन ही बॅग कोणाची असेल यासाठी ती बॅग उघडली असता त्यामध्ये यश बेकर्सची सर्व पावत्या व त्यांनी जमा केलेले पैसे आढळून आले. यामध्ये चालकाचा संपर्क मिळाला .
त्याचा संपर्क झाल्याबरोबरच आज संध्याकाळी ताबडतोब पाटील यांनी कशाचाही मोह व हव्यास न ठेवता त्याची बॅग व पैसे दसरा चौक येथील तरुण भारत कार्यालयांमध्ये बोलवून गाडी चालकाला त्याचे पैसे व बॅग प्रामाणिकपणे परत केले.
यश बेकरीचे चेअरमन रावसाहेब वंदूरे व यश बेकरीच्या सर्व टीमने दैनिक तरुण भारतचे पाटील यांचे अभिनंदन व आभार मानून त्यांना धन्यवाद दिले. पाटील यांना लवकरच आपण बेकरी मध्ये बोलून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करू असे यावेळी तरुण भारतशी बोलताना वंदूरे यांनी सांगितले.









