अवधूत म्हणाले, देहाचे जतन करणे आपल्या हातात नाही म्हणून हे राजा! मी देहाच्या प्रेमात अडकत नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी निःसंगपणाने पृथ्वीवर फिरतो. देहाच्या प्रेमामुळे मनुष्य कसा बंधनात अडकतो ते आपण पाहू. देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत, तितकी सारी बंधने आहेत, हे तू लक्षात ठेव. त्यांच्या योगाने वासना प्रबळ होऊन अनिवार वाढते. देहभोगातील मुख्य गोडी म्हणजे स्त्रीभोगाची. सर्वस्व खर्च करून तो आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतो परंतु स्त्रीचे पाणिग्रहण केले की, प्रपंचाचे दुःख वाढू लागते. त्या स्त्रियेच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडते. ते घर नीट चालवायला धनधान्याची समृद्धी पाहिजे. पुढे मुले बाळे होऊन प्रपंच वाढला म्हणजे अनिवार चिंता उत्पन्न होते. त्या मुलाबाळांचा अतिशय लळा लागून राहतो. त्यांच्याकरिता गडीमाणसे, दासदासी, गुरेढोरे बाळगावी लागतात. त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते. सुखाचा एक क्षणही मिळत नाही. व्याह्यांची आणि जावयांची ओढ लागते. आप्तइष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात.
त्यांचा यथायोग्य सत्कार करावयाचे महासंकट पडते आणि ते सारे सहन करता करता देहाची अगदी रेवडी वळून जाते. अवलंबून असणाऱयांचे पोषण करण्याकरिता अनेक उपाय मनुष्याला करावे लागतात. त्यासाठी स्वदेशात परदेशात तो हिंडू लागतो व रात्रंदिवस दगदग करून हैराण होतो. देहाला सुख देण्याच्या नादात शतपटीने दुःखाची वाढ करत असतो. मूर्ख माणसे देहाभिमानाने म्हणजे मी कर्ता आहे या भ्रमापोटी फुकट अभिलाषा वाढवितात. देहसुखाच्या इच्छेने जमीनजुमला इत्यादिकांचा खोडा पायात पडतो. घरदार, स्त्रीपुत्रांनी त्याला वेडे करून सोडल्यामुळे त्याचे भले कशात आहे हेच त्याला कळत नाही. घरदार, मुलेबाळे, संपत्ती यांचा लोभ देहाने वाढविलेला असतो. तीच वासना देहाच्या अंतकाली, दुसऱया जन्माच्या प्राप्तीला बीजरूपाने कारणीभूत होते.
जोंधळा कणसाच्या शेंडय़ावर चढतो आणि जमिनीवर झडून पडतो परंतु मुख्य बीज जमिनीत शिल्लक राहिलेले असते. त्या बीजाला पाणी व जमीन सापडली की, लागलीच पुढे त्याचे झाड वाढते. त्याप्रमाणे या देहाचे आयुर्मान संपले की, दुसऱया जन्मात घालण्याकरिता आधीच्या जन्मातल्या वासना कारणीभूत ठरतात. हे वासनाबीज लिंगदेहात शिल्लक राहून योनीद्वारे जन्मास घालते आणि स्वर्गात किंवा संसारात पाडते. देहामध्ये आसक्तीपूर्वक विषयांचे सेवन केले की, वासना अनिवार वाढते. जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते, तर कधी त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात. नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी ओढ लावतात. कधी कर्मेंद्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात.
याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहातून त्या देहात घेऊन जात असतात. यासाठी विषयांचा त्याग करण्याकरिता देहावर प्रेम करणे सोडून दिले पाहिजे. असे करण्याला मनुष्यदेहच उत्तम आहे. कारण ज्ञानप्राप्ती आहे ती याच देहात
आहे.
आपल्या स्वरूपाला जाणता यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्रीअनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली. काही जमिनीवरून चालणारी, काही आकाशातून फिरणारी, काही पाण्यात विहार करणारी, काही स्थावर व काही जंगम अशी शरीरे निर्माण केली. वृक्ष, सर्प, पशु, दंश करणारे प्राणी, राक्षस, पिशाच्च, बगळे, हंस, मासे, कासव इत्यादि झाडून साऱया योनी त्यानेच निर्माण केल्या. अशा 84 लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे त्याने नजर देऊन पाहिले, तर त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाही. मग श्रीअनंताने काय केले ते पुढील भागात पाहू.








