कारची विटावाहू टेम्पोला धडक, चौघे जण जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कारची विटावाहू टेम्पोला धडक बसून हल्याळ (जि. कारवार) येथील एक तरुण ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे जण जखमी झाले. बेळगाव-खानापूर मार्गावरील देसूर क्रॉसजवळ शनिवारी पहाटे ही घटना घडली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
मुजम्मीलअहम्मद जमीलअहम्मद शिवळ्ळी (वय 21) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. इर्फान इर्शाद टांगेवाले (वय 22), रिजवान अहम्मद शिवळ्ळी (वय 24), अय्याज अहम्मद शिवळ्ळी (वय 22), साहील (वय 24, चौघेही रा. हल्याळ) अशी जखमींची नावे आहेत.
जखमींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिरनवाडी येथील उरुसासाठी हल्याळ येथील पाच जण पिरनवाडीला आले होते. शुक्रवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटोपून शनिवारी पहाटे ते कारमधून हल्याळला निघाले. देसूर क्रॉसजवळ विटावाहू टेम्पोला कारची धडक बसून हा अपघात घडला. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









