किरण ठाकुर यांचे प्रतिपादन
टिळकांच्या प्रेरणेनेच लोकमान्य संस्थेची स्थापना, लोकमान्य संस्थेचा वास्कोत ग्राहक मेळावा
प्रतिनिधी / वास्को
लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाली होती. समाज सुजलाम सुफलाम व्हावा असे टिळकांना वाटत होते. लोकमान्य सहकारी संस्था त्यांचा हा उद्देश ठेऊनच वाटचाल करीत असून समाजाची गुंतवणूक समाजाच्या हितासाठीच खर्च करीत आहे. देश सशक्त होण्यासाठी समाजाचा आर्थिक विकास होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक, तसेच लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.
वास्को नवेवाडे येथील संस्थेच्या शाखेत शनिवारी दुपारी सत्यनारायण महापूजा व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ग्राहक मेळाव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर संस्थेचे संचालक गजानन धामणेकर, दक्षिण गोवा व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, समन्वयक ई मानुयल फुर्तादो, सहाय्यक विभागीय व्यवस्थापक अँन्थनी आझावेदो, ठेव व्यवस्थापक सावियो डिमेलो उपस्थित होते.
समाज सुजलाम सुफलाम व्हावा हे लोकमान्य टिळकांचे स्वप्न होते
किरण ठाकुर यांनी पुढे बोलताना लोकमान्य सहकारी पतसंस्था स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट करून ही संस्था विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी गोव्यातील जनतेसह इतर राज्यातील जनतेकडूनही चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले. 27 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाली होती. समाज सुजलाम सुफलाम व्हावा असे लोकमान्य टिळकांचे ध्येय होते. त्यांच्या हयातीत देश स्वतंत्र होऊ शकला नाही. त्यांचा समाजाप्रति असलेला उद्देश सफल करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. गावांचा विकास साधण्यासाठी लोकमान्य संस्थेने काही गावे दत्तक घेतलेली आहेत. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी लोकमान्य संस्था लोकांच्या मदतीसाठी धावून गेली. आर्थिक सहकार्य केले. सामाजिक विकासाबरोबरच शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी लोकमान्य संस्था योगदान देत आहे. गोव्याच्या विकासात ‘तरुण भारत’बरोबरच लोकमान्य संस्थेनेही वाटा उचललेला आहे. गोवा, हैदराबाद मुक्ती लढय़ात व बेळगावच्या सीमा लढय़ात योगदान दिलेल्या ‘तरुण भारत’ने 84 साली गोव्यात प्रवेश करून इथले अनेक प्रश्न धसास लावले. पुढे त्याला लोकमान्य संस्थेचीही जोड मिळाली. लोकमान्यतर्फे कोलवाळमध्ये आर्ट गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात आतापर्यंत गुंतवणुकदारांनी चांगले सहकार्य केले आहे. हे सहकार्य असेच चालू राहावे. लोकांनी अधिक गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीचा लाभ लोकमान्य संस्था शेवटी समाजाच्या हितासाठीच करीत आहे. एकमेकांच्या सहकार्यातूनच आम्हाला प्रगती साधायची आहे. देश सशक्त होण्यासाठी आर्थिक विकास आवश्यक आहे. भारत देश भविष्यात शक्तीशाली देश बनणार आहे. देशाच्या समृद्धीसाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे किरण ठाकुर म्हणाले.
या मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत करताना ई मानुयल फुर्तादो यांनी लोकमान्य संस्था, या संस्थेची प्रगती तसेच ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या संस्थेच्या विविध योजनांविषयी माहिती दिली व या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी अँन्थनी आझावेदो व सावियो डिमेलो यांनीही ग्राहकांना मार्गदर्शन केले. नवेवाडे वास्को शाखेच्या व्यवस्थापक मनिषा साळगांवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.









