वाराणसीत पंतप्रधानांनाच केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव दाखवून देण्यासाठी महासचिव प्रियंका वड्रा यांनी कंबर कसली आहे. प्रियंका यांनी वाराणसी येथूनच स्वतःच्या प्रचारमोहिमेची औपचारिक सुरुवात रविवारी केली आहे. हा देश भाजपचे पदाधिकारी, मंत्री, पंतप्रधानांच्या मालकीचा नाही, हा देश जनतेचा असल्याचे उद्गार प्रियंका यांनी सभेत बोलताना काढले आहेत. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे हे विशेष.
वाराणसीत पोहोचल्यावर प्रियंका यांनी सर्वप्रथम बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांनी दुर्गा मंदिरात जात दर्शन घेतले. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यावर त्या सभेत पोहोचल्या. आम्हाला मारा, तुरुंगात टाकले तरीही आम्ही लढत राहू. जोपर्यंत तुम्ही गृहराज्यमंत्र्यांना हटवत नाही तोवर आम्ही मागे हटणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
घाबरण्याची ही वेळ नाही
पंतप्रधान, त्यांचे अब्जाधीश मित्र, मंत्रिमंडळ हेच केवळ आनंदी आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत, पिकांना योग्य भाव मिळत नाही, तरुणाईला रोजगार मिळत नसल्याची स्थिती आहे. पण लोक सत्य बोलण्यास घाबरत आहेत. पण आता ही घाबरण्याची वेळ नाही. हा आमचा देश आहे. जनता जागरुक झाली नाही तर हा देश कोण वाचविणार? भाजपच्या राजकारणात अडकून पडल्यास देश वाचविता येणार नसल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.
शेतकरीमित्रांचा अपमान
आंदोलन केल्यास धडा शिकवू अशी धमकी शेतकऱयांना देण्यात येते. स्वतःचा गंगापुत्र म्हणवून घेणाऱया पंतप्रधानांनी शेकडो गंगापुत्रांचा अपमान केला आहे. 300 दिवसांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू आहे. 600 हून अधिक शेतकऱयांचा मृत्यू ओढवला आहे. सरकारच्या तीन कायद्यांमुळे सर्व काही अब्जाधीशांच्या हातात जाणार असल्यानेच हे शेतकरी आंदोलन करत असल्याचा दावा प्रियंका यांनी केला आहे.
लखीमपूरला का गेले नाही?
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौला आले, पण येथून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या लखीमपूर खीरी येथील शेतकऱयांच्या घरी जाऊ शकले नाहीत. हा देश म्हणजे एक श्रद्धा आहे. न्यायाच्या अपेक्षेवरच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. सोनभद्र, हाथरस आणि लखीमपूरच्या घटनांप्रकरणी सरकारने मदत करण्याऐवजी पीडितांवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.









