म्हादईसंदर्भात अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडणार
प्रतिनिधी/ पणजी
या देशाची लोकशाही प्रचंड धोक्यात आली असून देश पेटता ठेवण्याचे काम सध्या सुरु आहे. देशात महत्त्वाचे विषय असताना हे विषय बाजूला सारुन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोव्यात म्हादईसारखा अत्यंत महत्त्वाचा विषय असताना गोव्यासाठी नगण्य असलेल्या नागरिकत्व कायद्यावर मोठय़ा सभा घेतल्या जात आहेत. एका बाजूने गोव्याला हा विषय लागत नाही असे भाजप नेते सांगतात मग त्यावर रॅली का काढल्या जातात, असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केला व सरकारवर जहरी टीका केली.
महत्त्वाचे विषय संपविण्याचे पद्धतशीर कारस्थान भाजपने चालविले आहे. आज आर्थिकदृष्टय़ा प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोव्यासाठी म्हादई हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. खाणबंदीचा विषय आहे पण सरकार त्याकड दुर्लक्ष करीत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी येडियुराप्पा यांनी केंद्र सरकारकडे 50 हजार कोटींची मागणी केली. ही मागणी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केली. कर्नाटकला म्हादईचे पाणी पूर्णपणे वळवायचे आहे.
गोव्याचे राज्यपाल सांगतात म्हादईबाबत गोव्याची फसवणूक होत आहे. दुसऱया बाजूने येडियुराप्पा पाण्याच्या नियोजनासाठी 50 हजार कोटींची मागणी करतात. त्यामुळे याला निश्चितच अर्थ आहे. गोवा राज्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही असा याचा अर्थ होतो, असेही सरदेसाई म्हणाले. गोव्याचे हित जपले जाणार किंवा नाही याबद्दल संशय आहे. गोवा फॉरवर्ड राज्यपालांच्या भूमिकेला समर्थन देत आहे.
गोव्यासाठी म्हादई महत्त्वाची
गोव्यासाठी नागरिकत्वापेक्षा म्हादई महत्त्वाची आहे. गोव्याला नागरिकत्वाचा विषय लागत नाही, असे भाजपनेते सांगतात. दुसऱया बाजूने समर्थनार्थ मोठय़ा सभा घेतात. गोव्यासाठी जो विषय गंभीर आहे तो घ्यायचा सोडून गोवा सरकार जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी खटाटोप करीत आहे. हा नियोजनबद्ध प्रकार आहे. देश जळत ठेवायचे कारस्थान भाजप करीत आहे.
समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार
समाजात फूट पाडून दुही माजविण्याचा हा प्रकार आहे. महत्त्वाच्या समस्या व महत्त्वाचे विषय बाजूला सारुन लोकांचे लक्ष विचलीत केले जात आहे. नव्या दशकाची सुरुवात झालेली आहे व दशकाच्या सुरुवातीलाच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. गोवाही यातून सुटलेला नाही. देशातील जनता व गोव्यातील जनतेसमोर असलेल्या समस्या बाजूला सारुन समाज विभागणीच्या प्रकाराला प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. ज्वलंत विषय बाजूला ठेवायचे व प्रश्न उपस्थित करणाऱयांना पाकिस्तानला जा म्हणून सांगायचे.
म्हादई संदर्भात स्थगन प्रस्ताव आणणार
विधानसभेचे एकदिवशी अधिवेशन 7 जानेवारीला होत आहे. या अधिवेशनात मर्यादित कामकाज आहे मात्र गोवा फॉरवर्ड पक्ष म्हादईच्या मुद्यावरुन या अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणणार आहे. स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी एक सहांश एवढे बहुमत असावे लागते. किमान सात आमदारांचे त्यासाठी पाठबळ हवे आहे. गोवा फॉरवर्डकडे तेवढ संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी काँग्रेस पक्ष, मगो व अपक्षाचे समर्थन यासाठी मिळविण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. विरोधी पक्षाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी गोवा फॉरवर्ड गंभीर
खाणबंदीवर तोडगा काढणे सरकारला शक्य झालेले नाही. भाजपचे अगोदरचे नेते तारखा देत होते. आताही तारखा देण्याचे प्रकार बंद झालेले नाही या शब्दात सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. गोवा फॉरवर्ड खाणबंदीवर तोडगा काढण्याबाबत गंभीर आहे. त्यासाठी तज्ञाची मदत घेतली जाणार आहे. चांगल्या लोकांना सोबत घेऊन गोवा फॉरवर्ड पक्ष गोव्याच्या भवितव्याबाबत विचार करणार. हे दशक अत्यंत महत्त्वाचे असून काळजी घेतली तर गोव्याचे भवितव्य संपुष्टात येऊ शकते, असेही ते म्हणाले.
रोड शो म्हणजे पर्यटनमंत्र्यांची कौटुंबिक सहल
पर्यटनासंदर्भातले विदेशातील रोड शो सरकारने बंद करायला हवे. हे रोड शो म्हणजे पर्यटनमंत्र्यांची कौटुंबिक सहल बनलेली आहे. आज पर्यटन कुठे पोहोचले आहे हे पाहण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकमध्ये तिघाना मृत्यू आला. मंत्री मायकल लोबो सांगतात अमलीपदार्थामुळे मृत्यू. अद्याप मृत तरुणांचे पोस्टमार्टेम होत नाही. सरकारमुळे राज्याचे पर्यटन नष्ट झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
अमलीपदार्थ नसताना इडीएम होऊ शकते. राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे. स्वयंसाहाय्य गटाना शिक्षण खात्याकडून वर्षभर बिले दिली जात नाहीत, असेही ते म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवावी की नाही यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली मात्र अधिसूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.









