गुगल, फेसबुक इत्यादी विदेशी ऍप्सनी सारं विश्व व्यापून टाकलं आहे. पण आता ही ऍप्स पुरविणाऱया कंपन्यांची दादागिरीही वाढू लागली आहे. अनेक देशांच्या सरकारानांही या कंपन्या जुमानत नाहीत, अशी स्थिती असून ऑस्टेलियारसाख्या देशाने त्यांच्या नाडय़ा आवळण्यास प्रारंभ केला आहे.
भारतानं एक वेगळय़ा प्रकारे ही वेसण घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. संदेश क्षेत्रात अतिशय लोकप्रिय असणाऱया ट्विटर या माध्यमाचा भारतीय पर्याय असणारे ‘कू’ हे ऍप भारतातील लोकांना आवडू लागल्याचे दिसत आहे. आजवर 45 लाख लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. अर्थात, ट्विटरच्या साधारणतः 3 कोटी डाऊनलोडस्च्या तुलनेत ही संख्या आज कमी आहे. पण भविष्यकाळात चांगली वाढून ट्विटरला समर्थ पर्याय बनण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत.
कोरोना काळात चीनवर संतापलेल्या भारतीयांनी चीनी ‘माला’ला पर्याय शोधण्याचे मनावर घेतले. भारत सरकारनेही अनेक चीनी ऍप्सवर बंदी घातली. टिकटॉक या चीनी ऍपला चिंगारी हा भारतीय पर्याय मिळाला आणि तोही झपाटय़ाने लोकप्रिय झाला. चिंगारी रिलाँच केले गेल्यानंतर अवघ्या 36 तासांमध्ये एक कोटीहून अधिक लोकांनी ते डाऊनलोड केले. शेवटी काय, तर वाईटातूनही चांगले शोधण्याची प्रवृत्ती असेल तर काहीही अवघड नसतं, हेच खरं.









