ऑनलाईन टीम
देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि विदाराक परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर वेळोवेळी जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. आजही त्यांनी सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोना काळातही या प्रकल्पाचे काम सुरु असल्याने काँग्रेससह विरोधीपक्षांनी यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तर हे काम रोखण्याची मागणीही केली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे.
राहुल गांधी यांनी यावरुनच आज ‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत. त्यात एका फोटोत सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या फोटोत ऑक्सिजन गॅस घेवून लागलेली नागरिकांची रांग दाखवली आहे.
याआधीही राहुल गांधींनी कोरोना परिस्थितीवरुन वेळोवेळी हल्लाबोल केला आहे तर पत्र लिहून काही सुचना देखील केल्या आहेत. कोरोना नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीकाही त्यांनी शनिवारी ट्वीटवरुन केली होती.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प संसदेसमोरील १३ एकर जमिनीवर उभा राहात आहे. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.









