ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारचे लक्ष्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या बरोबरच अर्थव्यवस्थेला पुन्हा मूळ पदावर आणणे हे आहे. तसेच देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे आणि आत्मनिर्भर बनण्याची हीच ती वेळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हटले.
कोरोना व्हायरसच्या संकटा दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) विशेष कार्यक्रमाला व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, आज आपल्याला अनेक वस्तू आयात कराव्या लागतात. त्यामुळे आता आपल्याला आत्मनिर्भर बनून आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागेल. तसचं आपण तयार केलेल्या वस्तू कशा निर्यात करू हे देखील पहावे लागणार आहे. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मोदी यांनी टागोर यांची कविता देखील वाचून दाखवली. त्याच्या ओळी पुढील प्रमाणे : ‘नूतोन जुगेर भोर’ में कहा है-‘चोलाय चोलाय बाजबे जोयेर मेरी,पाएर बेगेई पोथ केटे जाय कोरिश ना आर देरी’ यानी’हर आगे बढ़ने वाले कदम पर घोषनाद होगा।दौड़ते पांव ही नया रास्ता बना देंगे।अब देरी मत करो।’
पुढे ते म्हणाले, आपली संकल्प शक्ती आपल्याला आपला मार्ग दाखवत असते. त्यामुळे सुरुवातीलाच जो हार पत्करतो त्याला नवीन संधी मिळत नाहीत. त्यामुळे आपण कायम प्रयत्न करत राहिल्यास नवीन संधी देखील उपलब्ध होतात व त्यामध्ये यश देखील प्राप्त होते. जगासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोना संकटाचा सामना भारत देश देखील एकजूट होऊन करत आहे. आणि आपली एकता हिच आपली ताकद आहे. त्यामुळे लवकरच आपण या महामारी वर मात करू अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.









