आरबीआयची माहिती- युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेसाठी प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येणाऱया कालावधीत देशामध्ये नवीन 8 खासगी बँका सुरू होण्याचे संकेत असून भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय)म्हटले आहे, की ‘ऑन टॅप’ गाईडलाइन्सच्या अंतर्गत बँक लायसन्ससाठी दोन वर्गामध्ये 4, 4 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या गाईडलाईन्सच्या मदतीने युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेसाठी परवाना दिला जाण्याची माहिती आहे. प्रस्ताव सादर करण्यामध्ये देशी-विदेशी कंपन्या आणि व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगितले आहे.
बँक परवान्यासाठी कोणाकोणाचे प्रस्ताव
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सल बँक परवान्यासाठी युएई एक्सचेंज ऍण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड, द रॅपट्रीटीज को-ऑपरेटिव्ह फायनान्स ऍण्ड डेव्हलपमेंट बँक लिमिटेड (आरइपीसीओ बँक), चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड आणि पंकज व अन्यजणांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. चैतन्य इंडियामध्ये फ्लिपकार्टचे सह संस्थापक सचिन बन्सल यांची मोठी हिस्सेदारी आहे. बन्सल यांनी सप्टेंबर 2019 मध्ये चैतन्यमध्ये 739 कोटी रुपयाची गुंतवणूक केली होती.
स्मॉल फायनान्स बँक लायसन्ससाठीचे प्रस्ताव
स्मॉल फायनान्स बँक परवान्यासाठी व्हीसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कालीकत सिटी सर्व्हिस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अखिल कुमार गुप्ता आणि द्वारा क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शिअल सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रस्ताव सादर केला आहे. आरबीआयने खासगी क्षेत्रातील युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेच्या ऑन टॅप लायसन्ससाठी 1 ऑगस्ट 2016 आणि 5 डिसेंबर 2019 रोजी मार्गदर्शक तत्वे सादर केली होती.
काय आहेत गाईडलाइन्स
w गाईडलाइन्सनुसार युनिव्हर्सल बँक सुरु करण्यासाठी कमीत कमी 500 कोटी रुपये पेड अप वोटिंग इक्विटी कॅपिटलची आवश्यकता आहे.
w स्मॉल फायनान्स बँकेच्या स्थापनेसाठी पेड-अप वोटिंग कॅपिटल आणि नेटवर्थ 200 कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
w कोणतीही अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक स्मॉल फायनान्स बँकेमध्ये बदल हवा असल्यास त्यासाठी 100 कोटी रुपयाची नेटवर्थ असणे गरजेचे आहे.
w आरबीआयने मागील महिन्यात म्हटले होते, की युनिव्हर्सल आणि स्मॉल फायनान्स बँकेसाठी आलेल्या प्रस्तावाच्या मूल्यांकनासाठी स्टँडिंग एक्सटर्नल ऍडव्हायजरी समिती स्थापन केली आहे.
आरबीआयची माहिती- युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेसाठी प्रस्ताव









