ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात जगातील सर्वात मोठे लसीकरण मागील तीन दिवसांपासून सुरू झाले असून, आतापर्यंत 3 लाख 81 हजार लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 580 जणांमध्ये साईड इफेक्ट्सआढळून आले. 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे, पण या मृत्यूंचा आणि लसीचा काहीही संबंध नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी म्हणाले, सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 7,704 सत्रांमध्ये 3,81,305 लोकांना लस देण्यात आली आहे. सोमवारी 1, 48,266 लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी बिहारमध्ये 8656, आसाममध्ये 1822, कर्नाटकात 36,888, केरळमध्ये 7070, मध्य प्रदेशात 6665, तामिळनाडूत 7628, तेलंगणात 10,352, पश्चिम बंगालमध्ये 11588 आणि दिल्लीत 3111 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.
साईड इफेक्टमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 7 जणांपैकी तीन जणांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकाला पाटपडगंज येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीला ऋषिकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये देखरेखीखाली ठेवण्यातआले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.









