दिवसभरात 22 हजार 752 रुग्णांची भर : चोवीस तासात 482 जण दगावले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा आणखी 22 हजार 752 ने वाढला असून आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जवळपास साडेसात लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. मृतांच्या संख्येतही 482 ने वाढ झाली असून एकूण बळींची संख्या 20 हजार 642 झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारत असून बुधवारपर्यंत चोवीस तासात 16 हजार 883 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता बरे होणाऱयांचा आकडा 4 लाख 56 हजार 830 वर पोहोचला असून देशात अजूनही जवळपास 2 लाख 64 हजार 944 कोरोना सक्रीय रुग्ण असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात रिकव्हरीचे प्रमाण सुधारत असून आता ते जवळपास 62 टक्क्यांवर पोहोचले आहे.
‘आरोग्य सेतू’ ऍपवर बुधवारी अपडेट करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात 7 लाख 42 हजार 417 इतके पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या संख्येत दररोज साधारणपणे 22 ते 24 हजारांनी वाढ होत असली तरी भारतातील सुयोग्य उपचारप्रणालीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे सांगण्यात आले.
दिवसभरात जवळपास अडीच लाख चाचण्या
आयसीएमआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिवसभरात साधारणपणे अडीच लाख जणांच्या स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत.
महाराष्ट्र, दिल्लीत मृतांचा आकडा सर्वाधिक
देशात एका दिवसातील मृतांचा आकडा सध्या साडेचारशे ते साडेपाचशेच्या आसपास असल्याचे आकडेवारीतून दिसते. बुधवारपर्यंत मागील 24 तासात 482 बळी गेले असून त्यात मुंबईतील सर्वाधिक 224, तामिळनाडूतील 65, दिल्लीतील 50, पश्चिम बंगालमधील 25, उत्तर प्रदेशमधील 18, गुजरातमधील 17, कर्नाटकातील 15 जणांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांपैकी महाराष्ट्रातील आकडा (9,250) सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली (3,165), गुजरात (1,977), तामिळनाडू (1,636), उत्तर प्रदेश (827), पश्चिम बंगाल (804), मध्यप्रदेश (622), राजस्थान (472) आणि कर्नाटक (416) या राज्यांचा क्रमांक लागतो.
झारखंडचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन
रांची : मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि पक्षातील एका निकटवर्तीय आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. आता त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. सध्या ते रांची येथील निवासस्थानामध्ये राहत असून तेथूनच राज्याचा गाडा सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन यांनी स्वतःबरोबरच आपल्या कार्यकक्षेतील आणि संपर्कातील सहकारी कर्मचाऱयांनाही होम क्वारंटाईन होण्याचे निर्देश दिले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मंत्री आणि आमदारांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकरच बरी होईल असा आशावाद सोरेन यांनी व्यक्त केला आहे.