4 लाख ऑक्सिजन बेडची तयारी -पंतप्रधानांनी घेतला ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी देशाच्या वेगवेगळय़ा भागात पंधराशे ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे ध्येय पुन्हा एकदा बोलून दाखवले असून या माध्यमातून 4 लाख ऑक्सिजन बेड्स उभारण्यासही प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता गृहीत धरून बैठकीत पंतप्रधानांनी संबंधितांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
देशात 1 हजार 500 ऑक्सिजन प्लान्ट्स उभारले जात असून त्याच्या कामाच्या प्रगतीची माहिती पंतप्रधानांनी घेतली. हे प्लान्ट लवकरात लवकर कार्यान्वित होतील याकडे लक्ष द्या अशी सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱयांना दिली आहे. पीएम केअर्स फंडातून तसेच विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या योगदानातून हे प्लान्ट उभारले जात आहेत.
ऑक्सिजन प्लान्टच्या हाताळणीबाबत हॉस्पिटल कर्मचाऱयांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे अशी अपेक्षाही मोदींनी बैठकीत व्यक्त केली. प्रत्येक जिह्यात यासाठीचे प्रशिक्षक उपलब्ध होतील याचीही दक्षता घ्या अशी सूचनाही मोदींनी केली आहे. ऑक्सिजन प्लान्ट उभारणीच्या कामाबाबत राज्यांच्या अधिकाऱयांशीही वेळोवेळी संपर्क साधला जात आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा जाणवला होता. ऑक्सिजन तुटवडय़ाच्या अभावी काहींना आपला जीव देखील गमवावा लागला होता. मात्र, आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तयारी सुरू केली आहे. त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन प्रकल्प आणि पुरवठा नियोजनासंबंधी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली.









