नवी दिल्ली /प्रतिनिधी
गेल्या काही दिवसात इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली. वाढत्या किंमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरपर्यंत किमती वाढतच जात आहेत. तेल कंपन्यांनी रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. तर मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत १०० च्या पुढे गेली आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रति लिटर वाढ होऊन विक्रमी पातळीवर आहे. दिल्लीतील पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेलचा दर ९२.८२ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल ११०.१२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल १००.६६ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.८० रुपये तर डिझेल ९५.९३ रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.५३ रुपये लिटर आणि डिझेल ९७.२६ रुपये प्रति लीटर आहे.
शनिवारी मुंबईत डिझेल शंभरी पार
दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारी प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात 29 पैशांची आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ झाली. यासह मुंबईत पेट्रोल 109.83 रु. प्रतिलिटर आणि डिझेल 100.29 रु. प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. ऐन सणासुदीच्या उंबरठय़ावर इंधन आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढीचे सत्र सुरू असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.