दिवसभरात 1 लाख नवे बाधित ः 1.74 लाख रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना महामारीची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस घट होत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी 1 लाख 636 नव्या बाधितांची नोंद झाली. हा आकडा गेल्या 62 दिवसांतील सर्वात कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 1 लाख 74 हजार 399 रुग्ण बरे झाले आहेत. याचदरम्यान, 2 हजार 427 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंचा हा आकडा गेल्या 45 दिवसानंतर अडीच हजारांपेक्षा खाली आलेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 9 हजार 975 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी 2 कोटी 71 लाख 59 हजार 180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 3 लाख 49 हजार 186 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या देशात 14 लाख 1 हजार 609 इतके सक्रिय रुग्ण आहेत. एका आठवडय़ापूर्वी संक्रमितांचा दर 9.1 टक्के होता. तो शनिवारी कमी होऊन 3.2 टक्केपर्यंत आला आहे. म्हणजेच गेल्या आठवडय़ापर्यंत देशात प्रत्येकी 100 टेस्टमधून 10 लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी होत होती. हा आकडा कमी होऊन आता चार टक्क्यांच्याही खाली आला आहे.









