दिवसात दोन हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; तीन लाखांसमीप नवे रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर वेगाने वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच वाढत्या मृत्यू संख्येनेही चिंता वाढवली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 23 रुग्णांचा कोरोना संसर्गाने बळी घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 21 लाखांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य आणि केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. तरीही नव्या बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत चालला आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 इतकी असून कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 76 हजार 039 आहे. गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 82 हजार 553 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 21 लाख 57 हजार 538 रुग्णांवर सध्या विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 13.01 कोटी डोसचे लसीकरण
देशात मंगळवारपर्यंत 13 कोटी 01 लाख 19 हजार 310 लसींचे डोस विविध लाभार्थींना देण्यात आल्याची माहिती आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. आता 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी दिल्यामुळे पुढील महिन्यापासून लसीकरण करणाऱयांची संख्या अधिकच वेग घेऊ शकते. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
18 वर्षांवरील नागरिकांनाही काही राज्यांमध्ये मोफत लस
केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेचा पुढील आराखडा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सरकारी इस्पितळांमध्ये करण्यात आलेले लसीकरण हे मोफत तर खासगी इस्पितळांमध्ये 250 रुपये शुल्क आकारून लस दिली जात होती. मात्र, पुढील टप्प्यातील लसीकरणातील शुल्काविषयी अद्याप निश्चित धोरण ठरलेले दिसत नाही. तरीही काही राज्यांनी आता मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, छत्तिसगड या राज्यांनी 18 वर्षांवरील नागरिकांनाही मोफत लस देणार असल्याचे बुधवारी जाहीर केले.
उत्तर प्रदेशात विकेण्ड लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात विकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही. तसेच उत्तर प्रदेश सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत. त्यांनीच ट्विट करत निर्णयांसंबंधी माहिती दिली.









