ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील चोवीस तासात देशात 6 हजार 654 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1 लाख 25 हजार 101 रुग्णांपैकी 69 हजार 597 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 51 हजार 781 रुग्णांची तब्येत सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत 3 हजार 720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाचे 80 टक्के रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण हे पाच राज्यात सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. त्यातही 60 टक्के रुग्ण हे फक्त मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे आणि चेन्नई शहरातील आहेत, अशी माहिती समोर आली आहे.